निवृत्त प्राप्तिकर आयुक्त, डॉक्‍टरला गंडविणारा अटकेत

निवृत्त प्राप्तिकर आयुक्त, डॉक्‍टरला गंडविणारा अटकेत

औरंगाबाद - बनावट जीपीए तयार करून मुंबईतील निवृत्त प्राप्तिकर आयुक्त; तसेच शहरातील महिला डॉक्‍टरची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. १६) अटक केली. आजमखान अब्दूल रहेमानखान (रा. लोटाकारंजा, औरंगाबाद) असे संशयिताचे नाव आहे. 

ओंकार गणपत गणवीर (रा. मुंबई) असे फसवणूक झालेल्या निवृत्त आयकर आयुक्तांचे; तसेच डॉ. गिरिजा पदमे (रा. गारखेडा) असे फसगत झालेल्या महिला डॉक्‍टरचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणा विषयी माहिती दिली. सोनियानगर, सातारा परिसर येथे गणवीर यांचे प्लॉट क्रमांक एक व दोन आहेत. याच भागातील प्लॉट क्रमांक २९ व ३२ च्या मालक डॉ. गिरिजा पदमे (रा. गारखेडा) या आहेत. संशयित आझमखान अब्दूल रहेमान याने प्लॉट क्रमांक एक व दोनचे मालक गणवीर यांच्याऐवजी दुसरीच व्यक्ती मुंबई येथील दुय्यम निबंधक कार्यालयात उभी केली व स्वत:च्या नावावर दोन्ही प्लॉटचे मुखत्यारपत्र (जीपीए) तयार करून घेतले. जीपीए तयार करून घेण्यापूर्वी गणवीर यांचे बनावट आधारकार्ड तयार केले व रजिस्टर विक्रीखताच्या आधारे तिघांना संशयिताने प्लॉट विक्री केले. गणवीर यांच्या प्लॉट क्रमांक एक व दोनची विक्री केल्यानंतर प्लॉट घेणाऱ्यांना गिरिजा यांचे प्लॉट क्रमांक २९ व ३२ हेच प्लॉट क्रमांक एक व दोन असल्याची थाप आझमखान अब्दूल रहेमानखान याने मारली व ताबाही दिला. प्लॉटवर अतिक्रमण झाल्याचे समजल्यानंतर डॉ. गिरिजा यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी तपास करून संशयित आझमखान अब्दूल रहेमानखान याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०१७ ला गुन्हा नोंदवला. यानंतर त्याला अटक केली. ही कारवाई निरीक्षक श्रीकांत नवले, सचिन संपाळ, मनोज उईके, महेश उगले, दादासाहेब झारगड, योगेश तळवंदे, विनोद खरात, कारभारी गाडेकर, गणेश शिंदे यांनी केली. 

मुंबईतून अटक
संशयित आझमखान मुंबईत असल्याची बाब आर्थिक गुन्हेशाखेला समजली. यानंतर पोलिसांचे एक पथक मुंबईत पोचले. त्यांनी बीआयटीचाळ येथून आझम खानला शहरात आणून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १८ जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com