रुग्णालय बंद होण्याच्या वेळेला येतात डॉक्‍टर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

निलंगा - येथील उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील उपचारासाठी आलेल्या नागरिकांना डॉक्‍टर वेळेवर येत नसल्यामुळे तासन्‌तास बसावे लागत आहे. दवाखाना बंद होण्याच्या वेळेत येऊन १५/२० पेशंट तपासून काम झाल्यासारखी ड्यूटी बजावत असल्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे.

निलंगा - येथील उपजिल्हा रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील उपचारासाठी आलेल्या नागरिकांना डॉक्‍टर वेळेवर येत नसल्यामुळे तासन्‌तास बसावे लागत आहे. दवाखाना बंद होण्याच्या वेळेत येऊन १५/२० पेशंट तपासून काम झाल्यासारखी ड्यूटी बजावत असल्यामुळे रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे.

कर्नाटक सीमेलगत हा तालुका असल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची निलंगा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी असते. जवळपास १० खाटांच्या या रुग्णालयात विविध विभागांचे तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत. अनेक डॉक्‍टर गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयात काम करीत आहेत. त्यांचे स्वतंत्र दवाखाने असल्याने सरकारी रुग्णालयातील रुग्णाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. सकाळी आठ वाजता दवाखाना सुरू होत असला तरी साडेअकरापर्यंत एकही डॉक्‍टर रुग्णालयात हजर राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या गरीब रुग्णांना उपचारासाठी डॉक्‍टरांची वाट पाहावी लागत आहे. येथील रुग्णालयात काही पदे रिक्त असली तरी औषधीचा मुबलक पुरवठा आहे. मात्र, केवळ डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. रुग्णालयात अनेक महिला बाळंतपणासाठी दाखल होतात. मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास डॉक्‍टर नसल्याने त्यांना नाइलाजास्तव त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयातील सुविधांबाबत अनेकदा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिकही यापुढे तक्रार करण्यास समोर येत नसल्याचे दिसत आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्‍टर निळकंठ सगर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असतानाही याच विभागाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. याकडे आता जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.

पालकमंत्री यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष 
याबाबत मागील चार महिन्यांपूर्वी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे रुग्णालयातील गैरसोईबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. रुग्णालयातील सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असतानाही याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी गांभीर्य घेतले नसल्याचे दिसत आहे.