अनुकरण नको, स्वयंभू व्हा!

अनुकरण नको, स्वयंभू व्हा!

औरंगाबाद - ‘‘मागच्याचे पुढे अनुकरण करण्याने अनेक संशोधक कालबाह्य झाले. आपल्याला कालोचित समाज निर्माण करायचा असेल, तर संशोधनाच्या बाबतीत स्वयंभू व्हावे लागेल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी केले. गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात मंगळवारी (ता. २१) ते बोलत होते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार’ श्री. चितळे यांना निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, स्वातंत्र्यसैनिक ना. वि. देशपांडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे एस. बी. वराडे, प्राचार्य शरद अदवंत, विजया चितळे, प्राचार्या मनोरमा शर्मा उपस्थित होत्या. श्री. अदवंत यांनी प्रास्ताविक केले. श्री. कुलकर्णी यांनी मनोगतातून जुन्या आठवणीद्वारे चितळे यांच्याशी मैत्रीचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले.

पुरस्कार वितरणानंतर श्री. चितळे यांचे ‘मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकासाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘नव्या आधुनिक व्यवस्थांचा अंगीकार करून अनेक देश पुढे गेले आहेत. आपल्यालाही त्यांच्या स्पर्धेत टिकायचे असेल, तर गंभीर सामाजिक आत्मचिंतन आवश्‍यक आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनी एका ध्येयाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. पूर्वजांची थोरवी गाऊन नव्हे, तर त्यांच्या पुढे विचार, संशोधन करून प्रगती साधावी लागेल. विकास व्यवहाराची कौशल्ये कमी आहेत. म्हणून अनेक योजना रखडल्या आहेत. ज्यांचे अनुभवक्षेत्र पुणे, मुंबई, नाशिक आहे, अशांचा सिंचन आणि कृषीविषयक योजनांवर व धोरणांवर प्रभाव आहे. त्याऐवजी ज्यांचे अनुभवक्षेत्र अभावग्रस्त भाग आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून धोरणे आखावी लागतील,’’ असे त्यांनी आवर्जून नमूद केले. श्री. वराडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com