सुकामेव्याचा बाजार थंडच! 

सुकामेव्याचा बाजार थंडच! 

औरंगाबाद - हिवाळा सुरू होताच शहरातील बाजारपेठांमध्ये सुकामेवा दाखल झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूलाही त्याची दुकाने लागली आहेत; मात्र यंदा गतवर्षीच्या तुलनेत बाजारभावात सुमारे वीस टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अद्याप थंडीने हवा तसा जोर पकडला नसल्याने सुकामेव्याचा बाजार थंडच आहे. 

थंडीची चाहूल लागली, की घरोघरी महिला पौष्टिक पदार्थ बनवण्याची तयारी करतात. हिवाळ्यात भूक जास्त लागते. पौष्टिक सुकामेव्याचे पदार्थ प्रकृतीला लाभदायक असतात. पचनशक्ती उत्तम राहावी म्हणून सुकामेव्याचे पदार्थ थंडीत जास्त प्रमाणात केले जातात. या पौष्टिक पदार्थामध्ये मेथीचे, डिंकाचे लाडू बनवण्याकडे महिलांचा कल जास्त असतो. त्यासाठी लागणारी मेथी, खारीक, खोबरे, डिंक, गोडंबी, काजू, बदाम, अंजीर, अक्रोड या पदार्थांची बाजारात रेलचेल दिसत आहे. यंदा जीएसटीमुळे सर्वच पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी काळी खारीक सत्तर ते दीडशे रुपये किलो होती. यंदा तिची 100 ते 300 रुपये किलो दराने विक्री होत आहे. गेल्या वर्षी खोबरे शंभर रुपये किलो होते. यावर्षी ते एकशे साठ रुपये आहे. बदाम गेल्या वर्षी सहाशे रुपये किलो होते. यंदा आठशे रुपये आहेत. बाकीच्या पदार्थांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. सध्या शहरात म्हणावी तशी थंडी नसल्याने सुकामेव्याच्या बाजार थंड आहे; परंतु थंडी जसजशी वाढत जाईल तसतशी या पदार्थांना मागणी वाढेल, असे विक्रेत्यांनी सांगितले. 

असे आहेत भाव ः 
खारीक काळी 100 ते 300 रुपये किलो, खारीक पिवळी 120 ते 140 रुपये, खोबरे - 160, मेथी - 60, डिंक - 240 ते 400, गोडंबी - 600, काजू - 950, बदाम - 800, अंजीर - 600, अक्रोड - 1200. 

थंडी जसजशी वाढत जाईल तसतशी मागणीत वाढ होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भाव वाढले आहेत. जीएसटीचाही परिणाम जाणवत आहे. खोबरे, खारीक, बदाम या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 
- दिलीप कासलीवाल, सुकामेवा विक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com