कर्जमाफीच्या घोळापुढे प्रशासन हतबल 

farmer loan waiver
farmer loan waiver

औरंगाबाद : कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी निवडक 21 शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात तुताऱ्या वाजवत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते बुधवारी (ता. 18) प्रमाणपत्र, आहेर देऊन गौरव करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात आठवडा उलटूनही यापैकी एकाही शेतकऱ्याच्या बॅंक खात्यावर पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सरकारने प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांची बोळवणच केली, असे म्हटले जात असून आता सरकारवर तांत्रिक अडचणी आहेत, असे सांगण्याची नामुस्की ओढावली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या रकमा बुधवारपासून (ता. 18) शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील, असे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, ही घोषणा अद्यापही कागदावरच राहीली आहे. त्यामुळे बहुचर्चीत कर्जमाफीचा घोळ सुटता सुटत नसल्याने सरकारच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्जमाफीवरुन सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याने घाईघाईत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीतील लक्ष्मीपुजनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निवडक लाभार्थी शेतकऱ्यांचा दिमाखात प्रमाणपत्रे देऊन गौरविण्याचा सोहळा घेतला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रमाणपत्र, आहेर देऊन 1 हजार 387 गावांपैकी निवडक गावांतील 21 शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. यानंतर जेवणही दिले. मात्र, अद्यापही पैसे केले नाहीत. शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना 34 हजार कोटींची ही कर्जमाफी आहे, असे जाहीर केले. मात्र, विरोधी पक्षातील नेत्यांनी ही कर्जमाफी दहा हजाराच्या आतच असेल, असे स्पष्ट केले होते. सद्यस्थितीनुसार तसेच चित्र दिसते आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इंटरनेटला स्पिडच मिळत नसल्याने मराठवाड्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी रात्र जागून काढल्या. यामुळे पुरते हाल झाल्यानंतर आता तरी काही हाती पडेल, अशी आशा होती. मात्र, शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. दरम्यान, सर्वस्तरातून टीका सुरु होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी 18 तारखेपासून पात्र कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील, असे जालना जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले. मात्र, प्रमाणपत्रे दिलेल्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात छदामही पडला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. 

प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे सांगीतले होते. त्यामुळे बॅंकेत जाऊन चौकशी करतोय. मात्र, अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे जिल्हा उपनिंबधक कार्यालयात गेलो. तेथील अधिकाऱ्यांनी तीन ते चार दिवसात जमा होतील, असे म्हटले. आम्हाला सांगून आठवडा उलटला तरीही पैसे जमाच होत नसल्याने चिंता वाटत आहे. 
- आत्माराम म्हस्के, अखातवाडा, ता. पैठण (प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले शेतकरी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com