दुध, भाजीपाला रोखला, पालेभाज्यात सोडली जनावरे 

शेखलाल शेख
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱ्यांनी आंदोलन करत रस्त्यावर वांगे, कांदे, भाजीपाला फेकुन संपात सहभाग घेतला. तर कॅंब्रिज ते सावंगी या रिंग रोडवर सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन करत ठिकठिकाणी गाड्या रोखून धरल्या. पिसादेवी-पोखरी येथील शेतकऱ्यांनी मेथीच्या शेतात शेळ्या सोडून दिल्या. यानंतर मेथीच्या शेतामध्ये ट्रॅक्‍टर फिरविण्यात आला

औरंगाबाद - शेतकरी संपाचे लोण आता गावोगावी पोहचले असून प्रमुख भाजीपाला, दुध उत्पादक गावातील शहराकडे येणारी रसद चौकाचौकात शेतकरी आंदोलनकर्त्यांनी रोखून धरली आहे. अनेक गावात भाजीपाला, दुध रस्त्यावर फेकुन शासनाचा निषेध करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्यात शेळ्या दिल्या तर काहींनी भाजीवर ट्रॅक्‍टर फिरविला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलजबावणी करावी, मालाला रास्ता भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. 

1 जूनपासून शेतकऱ्यांनी संप सुरु केल्यानंतर शुक्रवारी (ता.2) रोजी संप अतिशय तीव्र झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमटो, कांदे, लसुण, दुध रस्त्यावर फेकुन दिला आहे. पळशी शहर (ता.औरंगाबाद) येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करत रस्त्यावर वांगे, कांदे, भाजीपाला फेकुन संपात सहभाग घेतला. तर कॅंब्रिज ते सावंगी या रिंग रोडवर सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन करत ठिकठिकाणी गाड्या रोखून धरल्या, पिसादेवी गावाजवळ शेतकऱ्यांनी आंदोलन करत गाड्या रोखल्या येथील चौकात भाजीपाला, दुध, कांदे, लसुण, वांगी रस्त्यावर फेकण्यात आली. पिसादेवी-पोखरी येथील शेतकऱ्यांनी मेथीच्या शेतात शेळ्या सोडून दिल्या. यानंतर मेथीच्या शेतामध्ये ट्रॅक्‍टर फिरविण्यात आला. 
 
औरंगाबाद बाजार समितीत शुकशुकाट 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये शुक्रवारी फळभाजीपाला मार्केटला सुट्टी असते. मात्र येथे सुट्टीच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री होत असतो. संप असल्याने बाजार समितीत अतिशय कमी प्रमाणात भाजीपाला आल्याने शुकशुकाट होता. बाजार समितीमध्ये रात्रीपासून आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी ठाण मांडून भाजीपाला न आणल्याचे आव्हान केले. 
 
आडगाव मध्ये ग्रामस्थांनाच वाटले दुध 
औरंगाबाद जिल्ह्यातील झाल्टा जवळील आडगाव येथील शेतकऱ्यांनी संपाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी (ता. 1) दुध रस्त्यावर फेकूण दिले होते. दुसऱ्या दिवशी मात्र शेतकऱ्यांनी दुध फेकू न देता घरोघरी वाटून देण्याचे काम केले. आता आंदोलन सुरु असे पर्यंत आता दररोज गावाच दुध वाटप केले जाणार आहे. एवढेच नाही तर गावातील जे शेतकरी चिकलठाणा येथे भरणाऱ्या बाजारात भाजीपाला फळे घेवून जातात त्यांनीही बाजारात माल न नेणेच पसंत केले.