घरातच कचऱ्याच्या विल्हेवाटीची दिली शपथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले. 

औरंगाबाद - कचऱ्याची कोंडी फक्त औरंगाबादेत नाही, संपूर्ण देशच डम्पिंग ग्राउंड झाल्याचे चित्र आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने ‘मी महापालिकेला कचरा देणार नाही’ यासह त्रिसूत्री अमलात आणावी, असे आवाहन पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सोमवारी (ता. दोन) ‘जागर संवाद’ कार्यक्रमात केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे औरंगाबाद केंद्र आणि महात्मा गांधी मिशनतर्फे जेएनईसी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट सभागृहात शहरातील कचराकोंडीवर ‘जागर संवाद’ कार्यक्रम झाला. या वेळी डॉ. काळे बोलत होते. व्यासपीठावर महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, ‘एमजीएम’चे विश्‍वस्त तथा प्रतिष्ठानचे औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सचिन मुळे, सदस्य डॉ. भालचंद्र कांगो, सुनील कीर्दक, बिजली देशमुख, ‘घाटी’च्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची उपस्थिती होती. 

डॉ. काळे पुढे म्हणाले, ‘‘कचरा मानवाने निर्माण केलेला आहे. ‘फेकण्या’ची प्रवृत्ती वाढत असल्याने प्रत्येक शहरात हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. घरात निघणाऱ्या तीनशे ग्रॅम कचऱ्याची आपण विल्हेवाट लावू शकत नाही, महापालिकेला दोष देऊन काय उपयोग? ओल्या कचऱ्यापासून घरातच खतनिर्मिती व सुक्‍या कचऱ्याची आपणच विल्हेवाट लावल्यास कचऱ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटेल. प्रत्येकाने ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हा नारा दिला पाहिजे, प्लॅस्टिकबंदीसाठी शासनाला मदत करा,’’ असे आवाहन त्यांनी केले. भापकर म्हणाले, ‘‘घनकचरा व्यवस्थापनाची चळवळ मराठवाडाभर पोचण्याची गरज निर्माण झाली आहे. नीलेश राऊत यांनी प्रास्ताविक केले. श्री. कदम यांनी आभार मानले. महेश अचिंतलवार यांनी सूत्रसंचालन केले.

कोण काय म्हणाले... 
लवकरच कोंडी फुटणार - घोडेले

महापौर नंदकुमार घोडेले यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ‘‘नागरिक जागरूक आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोणी रस्त्यावर उतरले नाही, यापुढेही असेच सहकार्य मिळेल, शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी दिलेल्या निधीतून येत्या काही दिवसांत प्रकल्प मार्गी लागेल,’’ असे घोडेले म्हणाले.

विरोधी पक्षही जबाबदार - वरकड
संजय वरकड यांनी ‘औरंगाबाद शहर व कचरा’ या विषयावर सादरीकरण करताना कचऱ्यासंदर्भातील प्रमुख घडामोडी सांगितल्या. ‘‘गोरगरीब राहतात त्याच भागात कचरा नेला जातो व त्यांना पोलिसांच्या तोंडी दिले जाते. कचरा ही महापालिकेची जबाबदारी असतानादेखील कधी नव्हे, तो राज्य शासनाला हस्तक्षेप करावा लागला ही खेदाची बाब आहे. कचराकोंडीला विरोधकांसह सर्वच पक्ष जबाबदार आहेत. महापालिकेत कचऱ्यासारख्या गंभीर विषयावर चर्चा न होता इतर विषयांना महत्त्व दिले जाते,’’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या उद्रेकानंतर आली जाग - डॉ. कानन येळीकर
‘‘शहरात कचऱ्याचा महासागर झाला असून, नागरिकांच्या उद्रेकानंतर आपल्याला जाग आली. महापालिका कर घेत असेल, तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जबाबदारीही आहे. प्रत्येकाने ओला-सुका कचरा वेगवेगळा करून दिला पाहिजे, भाषणे करून समस्या मिटणार नाहीत, ठोस पावले उचलण्याची गरज आहे,’’ असे मत डॉ. कानन येळीकर यांनी व्यक्त केले.

...तरच शहर स्वच्छ होईल
डॉ. काळे यांनी उपस्थितांना तीन प्रकारे शपथ दिली. त्यात ‘माझ्या घरातील कचरा बाहेर टाकणार नाही, अन्नाचा एक कणही वाया घालणार नाही, तीन झाडे लावणार,’ अशी शपथ घेऊन प्रत्येकाने त्याचे उद्यापासून पालन केले तरच औरंगाबाद शहर स्वच्छ होईल, असे डॉ. काळे म्हणाले.

लेणी पाहताना वाटली लाज 
अजिंठा लेणीच्या पाहणीची आठवण सांगताना डॉ. काळे म्हणाले, ‘‘विदेशी पाहुण्यांना घेऊन अजिंठ्याला गेलो तेव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा साचला होता. हा कचरा पाहून लाज वाटली व आधी कचरा गोळा केला त्यानंतरच लेणी पाहिल्या.’’

सेवाभावी संस्थांनी केले सादरीकरण 
जागर संवादाच्या दुसऱ्या सत्रात स्वच्छ पुणे, स्त्री मुक्ती संघटना मुंबई, एमजीएम क्‍लीन इंडिया सेंटर औरंगाबाद, सीआरटी औरंगाबाद, औरंगाबाद कनेक्‍ट टीम, अदर पूनावाला फाउंडेशन पुणे, वायू मित्र, पुणे या महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थांनी त्या-त्या भागात राबविलेल्या यशस्वी प्रयोगांचे सादरीकरण केले.

Web Title: aurangabad news gabage dispose dr sharad kale