धुराने काेंडला श्‍वास!

धुराने काेंडला श्‍वास!

औरंगाबाद - आधीच वसंत ऋतूतील झाडांची पानगळ सुरू असल्याने रस्ते, घराचा परिसर पालापाचोळ्याने झाकून जात आहे. भरीस भर म्हणून शहरात कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने जागोजाग कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा कुठे टाकायचा याचा तिढा सुटत नसल्याने महापालिकेचे सफाई कर्मचारी आणि नागरिक सर्रास कचरा पेटवून देत आहेत. धुरामुळे प्रदूषणात भर पडत आहे. शिवाय धुरामुळे श्‍वसनविकारांबरोबर भविष्यात कॅन्सरचा धोका निर्माण होणार आहे. लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असणाऱ्यांना हा धूर धोकादायक बनत आहे.

कचरा व पालापाचोळा जाळल्यामुळे सुमारे ३८ पाउंड्‌स पर्टिक्‍युलेट मॅटर, २६ पाउंड्‌स हायड्रोकार्बन तर ११२ पाउंड्‌स कार्बन मोनॉक्‍साईड तयार होतात. हृदयविकार, दमा व धूम्रपान करणाऱ्यांना याचा सर्वाधिक धोका संभवतो. कचरा अर्धवट जळाल्याने त्यातून कार्बन मोनॉक्‍साईड बाहेर पडतो. हा सर्वाधिक घातक असून कार्बन मोनॉक्‍साईड रक्तातील लाल रक्तपेशींतील हिमोग्लोबिनबरोबर रासायनिक क्रिया करून त्याची ऑक्‍सिजन वहन करण्याची क्षमता कमी करतो. यामुळे आळस, डोकेदुखी आणि थकवा जाणवायला लागतो. जास्त काळ धुराच्या संपर्कात राहिल्याने बहुतांश कार्बन मोनॉक्‍साईड रक्तात मिसळून जातो. हृदयविकार, दमा, ॲनिमिया, फुप्फुसाचे रोग, गर्भवती महिला, नवजात बालके, तसेच ज्येष्ठांना यापासून मोठा धोका आहे. धुरातून लवकर सुटका नाही झाली तर जागीच मृत्यूचाही धोका आहे, असे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. 

औरंगाबाद येथे हवा प्रदूषणासंदर्भात काम करणाऱ्या दिल्ली येथील गीतांजली कौशिक म्हणाल्या, की कचरा जाळणे अतिशय धोकादायक आहे. त्यातून निघणाऱ्या घटकांमुळे कॅन्सरच्या रोगाचा जन्म होतो. आपण स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना कृती आराखडा तयार केला पाहिजे. आधीच धुळीचे प्रदूषण त्यात कचरा जाळल्याने धुराच्या प्रदूषणाची भर पडत आहे. कचरा जाळल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. 

कचरा जाळणे हा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्‍न आहे. यातून कार्बन मोनॉक्‍साईड वाढल्याने त्यातून विषारी कण हवेत मिसळतात. साचलेला कचरा, औद्योगिक कचरा जाळण्याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही तर हवा, पाणी प्रदूषित होण्याचा धोका उद्‌भवतो. 

कचरा जाळण्याऐवजी शहरात सीआरटीसारख्या व अन्य संस्थांची कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत घेतली गेली पाहिजे. कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त केले.

धुरामुळे  काय होते...

 धुरातील सूक्ष्मकण डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करतात.

 घसा दुखणे, नाक गळणे, खोकला, छातीदुखी हे त्रास जाणवतात. 

 श्वासाबरोबर धुरातील ८५ टक्के सूक्ष्मकण फुप्फुसात खोलवर जमा होतात आणि श्वसन संस्थेवर दबाव निर्माण करतात. यातूनच श्वसनाचे विकार होतात. 

 ॲलर्जी आणि दमा रुग्णांना होणाऱ्या त्रासात आणखी वाढ होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com