घाटीत पार्किंगची दुप्पट वसुली

घाटीत पार्किंगची दुप्पट वसुली

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात पार्किंग ठेकेदार वाहनधारकांची सर्रास लूट करत असताना लेखी तक्रार आल्यावर कारवाई करू, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. घाटी परिसरातील पार्किंगचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराला ठेक्‍याची उर्वरित रक्कम सप्टेंबर महिन्यापर्यंत साडेचार लाख रुपये भरणे बंधनकारक आहे. मात्र, त्याला नोव्हेंबरमध्ये आणखी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ठेकेदारावर प्रशासन मेहेरबान असल्याची चर्चा आहे.

घाटीत रुग्णांसाठी नोंदणी शुल्क दहा रुपये आहे. या शुल्कात डॉक्‍टरांकडून सल्ला, तपासणी, औषधे, वेळप्रसंगी ॲडमिट केल्यास तो उपचारही केला जातो. मात्र, घाटीत दुचाकी वाहन आणले तर पार्किंगसाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. पाच रुपये दुचाकी, तर वीस रुपये चारचाकीसाठी आकारण्याचे कंत्राटदाराला दिलेल्या करारात नमूद आहे. परंतु दुचाकी पार्किंगसाठी सर्रास दहा रुपयांची पावती देण्यात येत आहे. यासंबंधी प्रशासनाने एक बुकही जप्त केले. उल्हास पाटील यांनीही दहा रुपयांचे छापील एक पावतीपुस्तक प्रशासनाला जमा करून दिल्याचे सांगितले. त्यावरही काहीच कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले. 

आठ जून २०१७ ते सात मे २०१८ पर्यंतचे पार्किंगचे कंत्राट नऊ लाख रुपयांत देण्यात आले. त्यावेळी साडेचार लाख डिपॉझिट घेतले तर अर्धी रक्कम साडेचार लाख रुपये तीन महिन्यांत जमा करण्याचा करार झाला होता. तरी ती रक्कम अद्याप घाटी प्रशासनाकडे जमा झाली नाही, हे विशेष. याबाबत वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोरच्या पार्किंगची दहा रुपयांची पावती देणाऱ्याला जाब विचारला असता त्याने आपल्याकडे मालकाने एकच बुक दिले आहे आणि ते दहा रुपयांचेच आहे. तीन महिन्यांपासून भाव वाढले आहेत. तुम्हाला माहीत नाही का? असेही तो म्हणाला. 

पार्किंगची नवी ‘वाट’ 
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या पटांगणात जाण्यासाठी बाह्यरुग्ण विभागाच्या समोरची भिंत तोडून रस्ता तयार करण्यात येत असल्याची माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली. यामुळे अपघात विभागात जाणाऱ्या रुग्णांना सोयीचे होईल. घाटीच्या पार्किंगला शिस्त लावण्याची जबाबदारी पार्किंग ठेकेदाराची आहे. मात्र, ते कामही प्रशासनालाच करावे लागत असल्याचे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com