औरंगाबादेत जागतिक हवामान बदलावर होणार मंथन
तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
औरंगाबादः हवामान बदलामुळे कृषी व जलक्षेत्रावर अनिष्ठ परिणाम होत राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, जल व भुमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) तर्फे 14 ते 16 डिसेंबर ला वाल्मीत "जागतिक हवामान बदल व त्याचे कृषी व जलक्षेत्रावर होणारे बदल' या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.
तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
औरंगाबादः हवामान बदलामुळे कृषी व जलक्षेत्रावर अनिष्ठ परिणाम होत राष्ट्रीय अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठे, जल व भुमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) तर्फे 14 ते 16 डिसेंबर ला वाल्मीत "जागतिक हवामान बदल व त्याचे कृषी व जलक्षेत्रावर होणारे बदल' या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांनी मंगळवारी (ता. 12) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चर्चासत्राचे उदघाटन पद्मभुषण डॉ. आर. एस.परोडा यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 14) सकाळी दहा वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात होईल. यावेळी निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू, वाल्मीचे महासंचालक श्री. गोसावी, राजु बारवाले यांची उपस्थिती असणार आहे.
जागतिक प्रश्न बनलेल्या हवामानाचे अवकाळी, पुर परिस्थिती, गारपीट, उष्णतेची लाट तसेच पावसाचे खंड हे परिणाम आहेत. त्याचा अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनावर व पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक साधनसामग्री जसे जमीन, पाणी व वातावरण यांचा ऱ्हास होऊन कृषि उत्पादनात घट होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. पाणीसाठा कमी झाल्याने सिंचनाचे क्षेत्र कमी होत आहे. तसेच पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घट होत आहे. या सर्व घटकांवर सखोल चर्चा करण्यासाठी हे चर्चासत्र आयोजीत करत असल्याचे डॉ. वेंकटेश्वलू म्हणाले. यावेळी वाल्मीचे महासंचालक एच. के. गोसावी, ऑस्ट्रेलियाचे जलशास्त्रज्ञ कार्ल डॅमेन, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. अविनाश गरुडकर, डॉ. ए. एस. ढवण, डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.
विदेशातील शास्त्रज्ञ सहभागी होणार
या चर्चासत्रात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, श्रीलंका, व्हिएतनाम, बांगलादेश, नेपाळ आदीं देशांतील शास्त्रज्ञ सहभागी होत मार्गदर्शन करणार आहेत. आजपर्यंत देशविदेशातुन 800 संशोधनपर निबंध प्राप्त झाले असुन 600 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ व संशोधक या चर्चासत्रात सहभागी होणार असल्याचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सांगितले.
यावर होणार मंथन
चर्चासत्रात हवामान बदलाचा कृषी, जल, मत्स्य व पशु यावर होणारा परिणाम तसेच अल्पभुधारक शेतकऱ्यांची हवामान बदलावर मात करण्याची उपाययोजना यावर 14 सत्रात विविध संशोधनपर निबंधाचे सादरीकरण होणार आहे. नव तंत्रज्ञानाआधारे कृषी क्षेत्रात बदल करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. वाल्मी येथील संस्थेत तांत्रिक सत्राबरोबर हवामान बदलावर आधारीत उपकरणे, साहित्य व विविध पुस्तकांचे तसेच अनेक कंपन्याचे दालन असलेले प्रदर्शन शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे.