अपंग सेलच्या पदाधिकाऱ्याला  सुरक्षारक्षकाकडून मारहाण 

अपंग सेलच्या पदाधिकाऱ्याला  सुरक्षारक्षकाकडून मारहाण 

औरंगाबाद - अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्याला सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. एक) सकाळी दहाच्या सुमारास ‘घाटी’ रुग्णालय परिसरातील गेट क्रमांक ११७ समोर घडली. या घटनेनंतर काहीवेळ रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. शिवाजी गाढे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते प्रहार संघटनेच्या अपंग सेलचे पदाधिकारी आहेत. अपंगत्वाबाबत प्रमाणपत्र काढण्यासंबधी ‘घाटी’ रुग्णालयात काहीजण आले होते. प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेची जाण नसल्याने अपंग सेलचे पदाधिकारी श्री. गाढे त्यांच्या मदतीसाठी आले. नोंदणीसाठी व वेळ आरक्षित करून आलेल्या अपंगांना मार्गदर्शन करीत असताना गर्दी झाल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. त्यामुळे तेथून काढता पाय घेत ते गेटजवळ आले. तेथे एका अपंग व्यक्तीशी चर्चा करीत असताना मनात राग धरून सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर अधीक्षक कार्यालयासमोर 

त्यांच्यासह अन्य अपंग व्यक्तींनी धरणे धरून आपला रोष व्यक्त केला; तसेच मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षाकाला कामावरून काढावे, अशी मागणी श्री. गाढे यांनी केली. घटनेनंतर अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, सदस्य नारायण कानकाटे यांनी श्री. गाढे व समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला. साडेदहाच्या सुमारास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. चंद्रकांत थोरात यांनी मध्यस्थी करून तपासाअंती कारवाईचे आश्‍वासन दिले. घटनेनंतर गाढे यांनी सुरक्षारक्षकाविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

माझी चूक नव्हती, मी नोंदणीसाठी वेळ निश्‍चित करून आलेल्या अपंगांना मार्गदर्शन करीत होतो. सुरक्षारक्षकाने त्या वेळी असभ्य वर्तन केले. म्हणून मी गेटजवळ आलो. तिथे एकजण माझ्याशी बोलत होता. हे पाहून सुरक्षारक्षकांनी मला मारहाण केली. हा प्रकार एकप्रकारे अपंगांवर अन्यायच आहे. सुरक्षारक्षाकाला कामावरून काढावे, अशी आमची भूमिका आहे. 
- शिवाजी गाढे, जखमी अपंग प्रहार सेनेचा पदाधिकारी 

अपंगांची होरपळ होऊ नये, म्हणून प्रतीक्षा यादी संपण्यावर माझा भर आहे. या प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही. रीतसर तक्रार  करावी, असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे. आमच्या स्तरावरही आम्ही या प्रकरणी चौकशी करून कारवाई करू. 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, ‘घाटी’

रांग लावण्यावरून सुरक्षारक्षकांनी हटकल्यामुळे कार्यकर्त्याचा इगो दुखावला गेला. गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. चार महिन्यांपासून हे कर्मचारी तिथे कर्तव्य बजावितात. त्यांची आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. 
- सत्यनारायण जैस्वाल, सुरक्षारक्षक प्रमुख, ‘घाटी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com