पहिल्या, तिसऱ्या शनिवारी हेरिटेज वॉक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - शहराचा परिसर कला व संस्कृतीचा विकास, ऐतिहासिक ठेवा याविषयी सर्वांना माहिती मिळावी, या उद्देशाने औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१७) या मालिकेतील पहिल्या हेरिटेज वॉकची सुरवात सोनेरी महलपासून होणार आहे. 

औरंगाबाद - शहराचा परिसर कला व संस्कृतीचा विकास, ऐतिहासिक ठेवा याविषयी सर्वांना माहिती मिळावी, या उद्देशाने औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१७) या मालिकेतील पहिल्या हेरिटेज वॉकची सुरवात सोनेरी महलपासून होणार आहे. 

उन्हाळ्याचे निमित्त करून डिसेंबरमध्येच हेरिटेज वॉक बंद करण्यात आला होता, यावर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर पर्यटन विभागास उशिरा का होईना हेरिटेज वॉक सुरू करण्याचे शहाणपण सुचले. औरंगाबाद परिसरात वाकाटक, यादव, सातवाहन या घराण्यांची सत्ता भरभराटीस आली होती. मध्ययुगीन कालखंडात अनेक राजे, बादशाह, सुभेदार, सरदार यांचे या शहरात वास्तव्य होते. प्रत्येकाच्या कालखंडात या शहराची जडणघडण काळानुरूप बहरत गेली. चारशे-पाचशे वर्षांच्या ऐतिहासिक कालखंडात अनेक राजवाडे, स्मारके, वारसास्थळे, बगीचे, भव्य प्रवेशद्वार यांचे विविध शैलीतील वास्तूची रचनाकारांनी, शिल्पकारांनी, स्थापत्यकारांनी उभारणी केली. शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक महत्त्व सर्वांना समजावे, यासाठी औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांच्या पुढाकाराने हा हेरिटेज वॉक सुरू करण्यात येणार आहे. हेरिटेज वॉकबरोबर संबंधित पर्यटनस्थळाची पाहणी करून त्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. शहरातील इतिहासतज्ञ, शिल्पकार, स्थापत्य तज्ञ, पर्यटन व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, डॉक्‍टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शासनाचे व महापालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठातील प्राध्यापक शिक्षक, अधिकारी सर्वांनी या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी व्हावे. इच्छुकांनी सकाळी ७ वाजता सोनेरी महल परिसरात उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, वरिष्ठ प्रादेशिक पर्यटन व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.

उन्हाळ्यामुळे केला होता उपक्रम बंद 
उन्हाळ्याचे कारण पुढे करत डिसेंबर महिन्यातच हेरिटेज वॉक एमटीडीसीच्या वतीने बंद करण्यात आला होता. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या वॉककडे त्यांच्या निवृत्तीनंतर दुर्लक्ष करण्यात आले होते. ‘सकाळ’च्या वतीने एमटीडीसीच्या या कारभाराचे वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर एमटीडीसीने त्याची दखल घेत अखेर हेरिटेज वॉक सुरू करण्याची घोषणा केली.