औरंगाबाद-तेलवाडी महामार्ग १०४३ कोटींचा

आदित्य वाघमारे 
रविवार, 24 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - बहुचर्चित धुळे-सोलापूर महामार्गाच्या (एनएच-५२) औरंगाबाद ते तेलवाडी टप्प्यासाठी १०४३.१५ कोटींच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. शहरालगत उभारण्यात येणाऱ्या बायपासची निविदा स्वतंत्र काढण्यात आली असून, याचा सगळा खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.

औरंगाबाद - बहुचर्चित धुळे-सोलापूर महामार्गाच्या (एनएच-५२) औरंगाबाद ते तेलवाडी टप्प्यासाठी १०४३.१५ कोटींच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. शहरालगत उभारण्यात येणाऱ्या बायपासची निविदा स्वतंत्र काढण्यात आली असून, याचा सगळा खर्च सरकारच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे.

औरंगाबाद ते तेलवाडी यादरम्यान, ८५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यात शहराच्या बायपाससाठी ३०.२१ किलोमीटरची वेगळी निविदा निघाली आहे. या रस्त्यांची रुंदी ६० मीटर एवढी राहणार असून त्यावरून दिवसाकाठी सुमारे ५० हजार वाहने धावणार असल्याचा अंदाज भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने व्यक्त केला आहे. या रस्त्यामुळे बीड बायपास आणि जालना रोडवरील भार काही प्रमाणात हलका होणार आहे. औरंगाबाद-तेलवाडी रस्त्याच्या बायपासव्यतिरिक्त काढण्यात आलेल्या स्वतंत्र निविदेच्या माध्यमातून ५५.६१ किलोमीटर लांबीचा चार/सहापदरी रस्ता उभारला जाणार आहे. निपाणी ते करोडीदरम्यानच्या बायपासच्या ३०.२ किलोमीटर रस्त्यासाठी ५२१.२१ कोटी, तर करोडी ते तेलवाडीदरम्यानच्या ५५.६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५२१.९४ सरकारी तिजोरीतून खर्च होणार आहेत. 

इपीसी तत्त्वावर निघाल्या निविदा 
इंजिनियरिंग, प्रोक्‍योरमेंट आणि कन्स्ट्रक्‍शन (इपीसी) तत्त्वावर निपाणी-करोडी आणि औरंगाबाद-तेलवाडी रस्त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत निविदा घेणाऱ्या कंपनीने या रस्त्याची उभारणी करून एनएचएआयकडे ते हस्तांतरित करायचे आहे. याचा सगळा खर्च सरकारी तिजोरीतून करण्यात येणार असून, टोलमधून होणारी वसुलीही एनएचएआय करणार आहे. 

महामार्गावर काय असेल...
दोन मीटरचा शोल्डर, तीन मीटर रुंद फुटपाथ, ट्रक बे, हायमास्ट, २ उड्डाणपूल सर्व्हिस रोड (७.५ किमी), क्रॅश बॅरियर, बसथांब्यालगत रेलिंग, अडीच मीटर झाडे असलेले दुभाजक, सात ठिकाणी बसथांबे, चार अंडरपास, पाणी वाहण्यासाठी २ मीटरचा ड्रेन.

अडीच वर्षांत काम, चार वर्षे देखभाल
बायपास आणि औरंगाबाद-तेलवाडी रस्त्यांच्या उभारणीसाठी एनएचएआयतर्फे कंत्राटदार कंपनीला अडीच वर्षांचा अवधी नमूद करून देण्यात आला आहे. बांधकामाचा कालावधी अडीच वर्षे, तर त्या रस्त्याची देखरेख ही पुढील चार वर्षे रस्ता उभारणाऱ्या कंत्राटदाराकडे राहणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

वेरूळ, कन्नड येथे होणार ‘रेस्ट एरिया’
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली ‘रेस्टिंग एरिया’ ही संकल्पना औरंगाबाद-तेलवाडी रस्त्यावर राबविण्यात येणार आहे. या रेस्टिंग एरियामध्ये जड, हलक्‍या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग, कॅफेटेरिया तयार करण्यात येणार आहे. औरंगाबाद-तेलवाडीदरम्यान असे दोन हायवे नेस्ट अनुक्रमे वेरूळ आणि कन्नड येथे उभारण्यात येणार असल्याचे एनएचआयएच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.