मिनी घाटीवर  उद्‌घाटनापूर्वीच चालणार बुलडोझर!

माधव इतबारे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मिनी घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे या नव्याकोऱ्या इमारतीवर पाडापाडीची टांगती तलवार असल्याची माहिती समोर आली आहे. जालना रोडचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असून, त्यात ही इमारत चाळीस टक्के बाधित होणार आहे. त्यामुळे शासनाने इमारतीच्या बांधकामावर केलेला ३८ कोटींचा खर्च मातीत जाण्याची चिन्हे आहेत. 

औरंगाबाद - मिनी घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे या नव्याकोऱ्या इमारतीवर पाडापाडीची टांगती तलवार असल्याची माहिती समोर आली आहे. जालना रोडचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार असून, त्यात ही इमारत चाळीस टक्के बाधित होणार आहे. त्यामुळे शासनाने इमारतीच्या बांधकामावर केलेला ३८ कोटींचा खर्च मातीत जाण्याची चिन्हे आहेत. 

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या घाटी रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिकलठाणा येथे २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक हेक्‍टर शासकीय जागेवर ३८ कोटी रुपये खर्च करून तीनमजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये मेडिसीन, प्रसूती, सर्जरी, अपघात असे विविध विभाग असणार आहेत. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयाच्या उद्‌घाटनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. इमारतीचे शंभर टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, महापालिकेकडून नळजोडणी; तसेच अग्निशमन यंत्रणेचे काम बाकी आहे. 

पालकमंत्र्यांसह राजकीय मंडळी मिनी घाटीच्या उद्‌घाटनाची फीत कापण्याची तयारी करीत असताना दुसरीकडे जालना रोडच्या रुंदीकरणाचे वारेही जोरात वाहत आहेत. या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, त्यास मंजुरीही मिळाली. निधीच्या तरतुदीनंतर आगामी वर्ष-सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. जालना रोडचे रुंदीकरण करताना मिनी घाटीची नवीकोरी इमारत त्यात बाधित होत आहे. जालना रोड महापालिकेच्या विकास आराखड्यात ६० मीटर एवढा रुंद आहे. त्यानुसार मिनी घाटीच्या बाजूने रस्ता तीस मीटर रुंद राहील, तर इमारतीच्या साईड मार्जिनसाठी सरासरी साडेचार मीटर जागा सोडण्यात येते. त्यानुसार सध्याची उपलब्ध जागा व या इमारतीमधील अंतर पाहता ४५ टक्के इमारतीचे लचके तोडावे लागण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा उल्लेख जालना रोडच्या ‘डीपीआर’मध्ये (सविस्तर प्रकल्प अहवाल) करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर रुग्णालयाच्या बाजूने (चौधरी कॉलनीकडून येणारा) महापालिकेच्या विकास आराखड्यात २४ मीटर रुंदीचा रस्ता मंजूर असून, या रस्त्यातही इमारतीचा काही भाग जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर या इमारतीवर बुलडोझर चालणार हे निश्‍चित. 

इमारतीचा मोठ्या प्रमाणात भाग पडल्यास शासनाचा ३८ कोटींचा खर्च पाण्यात जाण्याची शक्‍यता आहे. रुग्णालयाच्या इमारतीची बांधकाम प्रक्रिया २०११ मध्ये सुरू झाली होती. त्यानुसार बांधकाम करण्यात आले. जालना रोडच्या रुंदीकरणात इमारत बाधित होते किंवा नाही हे सांगता येणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

बांधकाम परवान्याची नाही गरज 
जिल्हा शल्यचिकित्सकांनी २०१४ मध्ये महापालिकेला पत्र पाठवून बांधकाम परवन्यासंदर्भात विचारणा केली होती; मात्र त्या वेळी महापालिकेच्या नगररचना विभागाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये शासकीय कार्यालयाच्या इमारतीसाठी बांधकाम परवानगीची गरज नाही, असे कळविण्यात आले आले. त्यानंतर मात्र दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नाका ते चिकलठाण्यापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाची घोषणा केली, त्यामुळे या नव्या इमारतीवर पाडापाडीची टांगती तलवार आहे.

जालना रोडवर प्रचंड वाहतूक असते. रुंदीकरणानंतर रुग्णालय आणखीच रस्त्यालगत येईल. त्यामुळे रुग्णांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. शासनाने या इमारतीवर मोठा खर्च केला आहे. म्हणून पाडापाडीनंतर उर्वरित इमारतीचा इतर शासकीय कार्यालयांसाठी वापर करण्यात यावा.
- संजय चौधरी, माजी नगरसेवक