स्ट्रेचर शोधण्यात नातेवाइकांनाच फुटतो घाम!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

औरंगाबाद - ‘घाटी’त उपचार चांगले मिळतात; मात्र रुग्णाला दाखल करेपर्यंत अग्निदिव्य पार करावे लागत आहे. रात्री अपघात विभागात दाखल केलेल्या रुग्णाला वॉर्डात हलविण्यासाठी स्ट्रेचरची शोधाशोध करण्यात नातेवाइकांना घाम फुटतो. तर मेडिसीन इमारतीत स्ट्रेचरसाठी रुग्ण व नातेवाइकांची आबाळ होत आहे.

औरंगाबाद - ‘घाटी’त उपचार चांगले मिळतात; मात्र रुग्णाला दाखल करेपर्यंत अग्निदिव्य पार करावे लागत आहे. रात्री अपघात विभागात दाखल केलेल्या रुग्णाला वॉर्डात हलविण्यासाठी स्ट्रेचरची शोधाशोध करण्यात नातेवाइकांना घाम फुटतो. तर मेडिसीन इमारतीत स्ट्रेचरसाठी रुग्ण व नातेवाइकांची आबाळ होत आहे.

मेडिसीन विभागात अत्यंत महागडे उपचारही सहज आणि दर्जेदार आहेत; मात्र तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग सुखकर नसल्याची भावना नातेवाइकांची आहे. ‘घाटी’त वीस स्ट्रेचर असल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे; मात्र त्याचे नियोजन नसल्याने ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्याचे चित्र आहे. अपघात विभागात दाखल केलेले रुग्ण घाटीच्या रुग्णवाहिकेने मेडिसीन विभागात सोडण्यात येतात. कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी रुग्णवाहिकेपासून वॉर्डात दाखल होण्याचा मार्ग सुकर व्हावा, ही रास्त मागणी नातेवाइकांची आहे. 

तुटलेल्यांची दुरुस्ती होईना
दोन स्ट्रेचर, दोन व्हील चेअर मेडिसीन विभागात आहेत. त्यातील तीनची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे नातेवाइकांना त्यावरून रुग्ण नेण्यापेक्षा उचलून घेऊन जाण्याचे चित्र कायम दिसते. रात्री दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची आबाळ होण्याचे प्रकार जास्त आहेत. ‘एमएसएफ’चे सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर, समाजसेवक काही प्रमाणात मदत करतात; मात्र ही परिस्थिती सुधारण्याची मागणी नातेवाइकांतून होत आहे.

नगरसेवक कुलकर्णीस अटक आणि सुटका
औरंगाबाद, ता. १५ ः महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते, सिडको एन-आठचे नगरसेवक मकरंद कुलकर्णीवर महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला सोमवारी (ता. १५) सकाळी राहत्या घरातून अटक करण्यात आली.  नगरसेवक मकरंद कुलकर्णी याने गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास एका ३९ वर्षीय महिलेचा पाठलाग करून ‘तू काहीही केले, तरी तुला सोडणार नाही’ असे म्हणून विनयभंग केला; तसेच पतीला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सोमवारी (ता. १५) त्याला पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. गुन्हा जामिनपात्र असल्याने सायंकाळी चार वाजता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली, असे ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एम. प्रजापती यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news hospital Stretcher