जायकवाडीत आपत्कालीन स्थितीत 26 टीएमसी अतिरिक्‍त क्षमता 

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

औरंगाबाद : पैठणनजीकचे जायकवाडी धरण पूर्ण काठोकाठ भरावे, अशी एकीकडे प्रार्थना केली जाते. दुसरीकडे धरण भरण्याची स्थिती निर्माण झाली, की लाभक्षेत्रातील नागरिकांत धडकी भरायला लागते; मात्र उर्ध्व भागातून मोठ्या प्रमाणात आवक झाली, तरी 102 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात आपत्कालीन स्थितीत तब्बल अधिकचे 26 टीएमसी पाणी काही काळापुरते साठवता येते. त्यामुळे उर्ध्व भागात पूर आला तरी धांदल उडण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. 

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडीचे नाव घेतले जाते. हे धरण बांधण्यासाठी तब्बल 11 वर्षे हजारो जणांचे हात लागलेले आहेत. या धरणाच्या दरवाजाच्या रचनेनुसार महत्तम पूर विसर्ग क्षमता 6 लाख 41 हजार क्‍युसेक एवढी आहे. मात्र, 2006 मध्ये काही चुका झाल्याने पैठण शहरात तर पाणी घुसलेच होते. त्याशिवाय 206 गावे बाधीत झाली होती. पैठण शहरातदेखील काहीकाळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होड्यांमधून प्रवास करावा लागलेला आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अक्षरश: मोठी यंत्रणा आयात करावी लागली होती; मात्र भविष्यात ऊर्ध्व भागात पूर आले तरी 26 टीएमसी पाणी साठवण करता येऊ शकत असल्याने हा खूप मोठा दिलासाच म्हटला जातो. मात्र, आतापर्यंत अशी आपत्कालीन स्थिती निर्माणच झालेली नाही. त्यामुळे आजतागायत क्षमतेपेक्षा अधिकच हे 26 टीएमसी पाणी साठवण करण्याची वेळच आलेली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. हे अधिकचे पाणी साठवण करताना ऊर्ध्व भागातील काही गावांमध्ये पाणी जाण्याची शक्‍यतादेखील असते; मात्र प्रत्यक्षात अशी वेळ आलीच तर तातडीने अशा गावांना सतर्क केले जाते. 

कालव्याच्या संरक्षणाबाबत प्रशासन गाफील 
102 टीएमसी क्षमतेच्या जायकवाडी या धरणाच्या खालील बाजू दुर्लक्षित असून धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. धरणातून काही अंतरावरच डाव्या कालव्याची स्थिती भयंकर झालेली आहे. अगदी विसर्ग करण्यात येणाऱ्या दरवाजाजवळच कालव्याच्या भिंती तुटलेल्या असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे, धरणातून गोदापात्रात विसर्ग करावा लागला. अशी वेळ आलेली असतानाही प्रशासनाने कालव्याची अवस्था "जैसे थे'च राहू दिलेली आहे. यामुळे धरणाच्या संरक्षणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com