जिल्हा न्यायालयात  कोसळली लिफ्ट 

जिल्हा न्यायालयात  कोसळली लिफ्ट 

औरंगाबाद - जिल्हा न्यायालयातील लिफ्टमध्ये सोमवारी (ता. २६) अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे चौथ्या मजल्यावर असलेली लिफ्ट धाडकन्‌ तळमजल्यावर कोसळली. अपघातग्रस्त लिफ्टचा दरवाजाही लॉक झाल्याने प्रचंड धावपळ झाली. हा प्रकार लक्षात येताच पोलिस व नागरिकांनी प्रयत्न करून कसाबसा दरवाजा उघडला. त्यानंतर लिफ्टमधील सात जणांची सुटका करण्यात आली. या घटनेने लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

जिल्हा न्यायालयात सोमवारी सायंकाळी कामकाज संपल्यानंतर पाचच्या सुमारास कामकाजासाठी आलेले माणिकचंद आसाराम महातोले, ओमप्रकाश राजाराम बसय्ये, निर्भय सुरेशजी मकरिये, सुभाष बाबूलालजी गुरुभय्ये, चंदाबाई मोहनलाल सुरवय्ये व अन्य दोघे असे सातजण तिसऱ्या मजल्यावरून बसले. त्यांना तळमजल्यावर यायचे होते. त्यांनी लिफ्टचे तळमजल्याचे बटन पुश केले. मात्र, कुणीतरी चौथ्या मजल्याचे बटन पुश केलेले असल्याने लिफ्ट सुरू झाल्यानंतर ती चौथ्या मजल्यावर गेली. त्यानंतर क्षणार्धात लिफ्टचा नेहमीपेक्षा अचानक वेग वाढला आणि काही क्षणांत प्रचंड वेगात लिफ्ट तळमजल्यावर आदळली. या क्षणी प्रचंड मोठा  आवाज झाला. प्रत्येकजण सैरावैरा धावू लागला. त्यानंतर लोक लिफ्टजवळ आले, मात्र लिफ्ट लॉक झाल्याने उघडत नव्हती. विशेष म्हणजे लिफ्ट ही तळमजल्यावर जमिनीच्या बरोबर न थांबता तीन फूट आत खड्ड्यात गेली होती. आत अडकलेले सर्वजण मदतीसाठी आरडाओरड करीत होते. मात्र, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करूनही तो काही केल्या उघडेना म्हणून अस्वस्थता आणखीच वाढत गेली. परिसरात न्यायालयीन कामासाठी आलेल्या पोलिसांनीही दरवाजा उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल दहा ते पंधरा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर दरवाजा कसाबसा उघडण्यात यश आले. त्यानंतर सातही जणांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे लिफ्टचे छतही कोसळले असल्याने प्रत्येकाला जबर मुकामार लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com