सिडको झालर विकास आराखड्यास मंजुरीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

राजेभाऊ मोगल
रविवार, 25 जून 2017

सिडको झालर विकास आराखडा मंजूर करावा, या क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे त्वरीत थांबवावे, या मागणीसाठी मराठा मावळा, महानगर नियोजन समिती, छावा संघटनासह 26 गावातील ग्रामस्थांनी रविवारी (ता. 25) दुपारी जालना रोडवरील पंचवटी चौकात रास्तारोको केला.

औरंगाबाद - सिडको झालर विकास आराखडा मंजूर करावा, या क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे त्वरीत थांबवावे, या मागणीसाठी मराठा मावळा, महानगर नियोजन समिती, छावा संघटनासह 26 गावातील ग्रामस्थांनी रविवारी (ता. 25) दुपारी जालना रोडवरील पंचवटी चौकात रास्तारोको केला.

महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या तालुक्‍यातील 26 गावांच्या झालर क्षेत्र विकास आराखड्यास 2006 पासून मंजूरी रखडली आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील झालेली आहेत. दरम्यान, रविवारी महानगर नियोजन समिती, मराठा मावळा, छावा या संघटनांसह 26 गावांमधील ग्रामस्थांनी हॉटेल पंचवटी चौकात रास्तारोको केला. राज्य सरकारचा धिक्‍कार करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक रस्त्यावर बसल्यामुळे काहीवेळ वाहतुक खोळंबली होती. सहायक पोलिस आयुक्‍त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, मनीष कल्याणकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना बाजूला करीत वाहतुक सुरळीत केली. या आंदोलनात मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे, हनुमंत कदम, महानगर नियोजन समितीचे संचालक तथा गांधेलीचे सरपंच राहुल सावंत, सुनील औटे, सचिन मिसाळ, शुभम केरे, विष्णु भटेकर, संदिप काळे, भाऊसाहेब गायके, अप्पासाहेब डक, राजेंद्र भेसरकर, रविंद्र डक यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होते.