शेतकरी संप सुरुच ठेवणार; बळीराजा शेतकरी संघ

राजेभाऊ मोगल / अतुल पाटील
शनिवार, 3 जून 2017

औरंगाबाद : जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार, असा निर्धार बळीराजा शेतकरी संघाचे गणेश जगताप यांनी शनिवारी (ता. तीन) सकाळी केला.

औरंगाबाद : जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार, असा निर्धार बळीराजा शेतकरी संघाचे गणेश जगताप यांनी शनिवारी (ता. तीन) सकाळी केला.

संप मागे घेण्यास सांगण्यामागे कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबद्दल प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले, की शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा मोफत मिळावा, ठिबक सिंचन योजनेला शंभर टक्‍के अनुदान मिळावे, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी शासनाने तीन लाख रुपयांचे अनुदान द्यावे, संपूर्ण दारुबंदी करावी, शेतकऱ्यांच्या यासह अन्य मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.

शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. संपाच्या माध्यमातून जागोजागी शेतकरी आपल्या भावना व्यक्‍त करीत असतानाच मुख्यमंत्र्यांनी काही जणांना हाताशी धरून संप मागे घेण्यास लावले. या कृतीचा आम्ही निषेध करतो. 

नगर जिल्हातील पुनतांबा येथील धनंजय जाधव हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी हा संप मागे घेण्यास हातभार लावला. तसेच शेतकरी नेते म्हणून घेणारे जयाजीराव सूर्यवंशी हे देखील भाजपाच्या गोटात गेल्यासारखे वागत आहेत. राज्यभर शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा धसका घेत असतानाच संप मागे घेण्याचे कटकारस्थान रचले गेले आहे. 

मागील तीन महिन्यापासून यावर काम सुरु होते. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात एकजुट झाली. शेतकरी आत्तापर्यंत आत्महत्या करीत होते. सध्या कथीत शेतकरी नेत्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना फाशी देण्याचा कटच रचला आहे, असेच म्हणावे लागेल. 
या प्रसिद्धीपत्रकावर पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, कोकण विभागाचे अध्यक्ष अंकुश देशमुख, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष महेश शंकरपेल्ली, राज्य संपर्क प्रमुख मनोज शितोळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रवि शर्मा यांची नावे आहेत.

#शेतकरीसंपावर

शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने

शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी

सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे