चौदा वर्षांपासूनची प्रतीक्षेनंतर झाला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी या रस्त्यासाठी शिफारस केली होती. त्यानुसार हा रस्ता माझ्या निधीतून मंजूर करून घेतला आहे. पुढील आठ दिवसांत लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. 
- सुभाष झांबड, आमदार

गंगापूर : शिंगीच्या (ता.गंगापूर) ग्रामस्थांचा चौदा वर्षांचा वनवास संपला आहे. १४ वर्षांनंतर एक कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीतून रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे. 

या रस्त्याचे १४ वर्षांपूर्वी काम करण्यात आले होते; परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने येथे मोठमोठे खड्डे पडले होते. शहरात येणे-जाणे म्हणजे गावापुढे मोठे संकट होते. 

गावाला दर्जेदार रस्ता व्हावा अशी मागणी होत होती. २०१७ मध्ये हा रस्ता पूर्णत्वास गेल्याने अनेक वर्षांची गावकऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. गावाकडे जाणारा रस्ता झाल्याने शहारापासून  एक दुर्लक्षित अनेक खेडे जगाशी जोडले गेले आहेत.

या रस्त्यावरून वैजापूर-गंगापूर अशा दोन्ही शहराला जाण्याची सोय झाली असून झोडेगाव, पिंपरी, भालगाव, मेंढी, मालुंजा, नारवाडी या गावांची सोय झाली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. शालेय विद्यार्थ्यांवर झाडे जगविण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
- संजय तिखे, उपसरपंच, शिंगी