लोका सांगे ब्रह्मज्ञान अन्‌ स्वत: ...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - ‘आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही; पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.’ अशी म्हण प्रचलित आहे. असाच काहीसा प्रकार पोलिस दलात मंगळवारी (ता. सहा) पाहावयास मिळाला. पोलिस आयुक्तांनी सीटबेल्ट व काळ्या काचांविरोधात कडक कारवाई करा, असा आदेश दिला खरा. पण, त्यांच्याच पोलिस खात्यातील चालकांनी सीटबेल्ट वापरलेच नाहीत. 

औरंगाबाद - ‘आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही; पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.’ अशी म्हण प्रचलित आहे. असाच काहीसा प्रकार पोलिस दलात मंगळवारी (ता. सहा) पाहावयास मिळाला. पोलिस आयुक्तांनी सीटबेल्ट व काळ्या काचांविरोधात कडक कारवाई करा, असा आदेश दिला खरा. पण, त्यांच्याच पोलिस खात्यातील चालकांनी सीटबेल्ट वापरलेच नाहीत. 

पोलिस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर यशस्वी यादव यांनी कडकपणे सुरू असलेल्या हेल्मेट संबंधित कारवाया किंचितशा शिथील केल्या. मात्र, त्या बदल्यात काळ्या काचा व सीटबेल्ट कारवाया कडकपणे राबविण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार चार ऑलआऊट ऑपरेशनही राबविण्यात आले. सर्व उच्चपदस्थ अधिकारी, ठाणेदार, कर्मचाऱ्यांसोबतच पोलिस आयुक्त स्वत: या मोहिमेत रस्त्यावर उतरले. या सर्वांनी काळ्या काचा व सीटबेल्टविरुद्ध ठोस कारवायांही सुरू केल्या. नागरिकांनी सीटबेल्टबद्दल जागरूक असावे, यासाठी त्यांनी दंडात्मक कारवाई करून ‘महसूल’ही मिळवला. परंतु, लोकांत जागृती घडविण्यासाठी (शिकविण्यासाठी) कारवाया करणाऱ्या पोलिस विभागाने मात्र सीटबेल्ट परिधान करण्याबाबत त्यांच्याच वाहनचालकांत जागृती केली नसल्याची बाब समोर आली आहे. यातील बहुतांश जण सीटबेल्टच वापरत नसल्याचे दिसून आले. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे पोलिस दलातीलच बहुतांश वाहनांना नियमांत न बसणाऱ्या काळ्या काचा लावलेल्या आहेत. अशा प्रकारांमुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान अन्‌ स्वत: कोरडे पाषाण’ अशा खरमरीत प्रतिक्रियाही नागरिकांतून व्यक्त झाल्या.

आयुक्तांचे स्कॉटिंग वाहनही 
विशेष बाब म्हणजे पोलिस आयुक्त यांच्याच स्कॉटिंग वाहनाच्या चालकाने सीटबेल्ट परिधान केलेला नव्हता. सीटबेल्ट न लावताच पोलिसांची वाहने सर्रास सीटबेल्ट परिधान न करताच दामटवली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

कित्ता गिरवणार नाहीत जुन्या आयुक्‍तांचा 
तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हेल्मेट अंमलबजावणीबाबत कडक भूमिका घेत कारवाया केल्या होत्या. परंतु, या कारवायांपेक्षा आताच्या पोलिस आयुक्तांनी सीटबेल्ट व काळ्या काचा असलेल्या वाहनांना ‘लक्ष’ करायचे धोरण अवलंबिले. यावरूनच अमितेशकुमार यांचा नवीन आयुक्त कित्ता गिरवणार नसल्याचे दिसून येते.

टॅग्स