एसटीच्या अपार्टमेंटच्या इमारतीवर कोणत्याही क्षणी हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस आली असून, या इमारती केव्हाही पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे महामंडळाने पंधरा दिवसांत निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. 

औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस आली असून, या इमारती केव्हाही पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे महामंडळाने पंधरा दिवसांत निवासस्थाने खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. 

एसटी महामंडळातील अल्प उत्पन्न गट कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधलेली आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारी दोन इमारतींत आणि विभागीय कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या चार फ्लॅटमध्ये ही ९६ निवासस्थाने आहेत. महामंडळाने १९८२ मध्ये सदर इमारती बांधलेल्या आहेत. साधारण तीस वर्षे आयुष्य असलेल्या या इमारतींना ३५ वर्षे उलटले आहेत. सध्या या इमारतींची मोठी दुरवस्था झाली असून, जागोजागी प्लास्टर निघाले आहे. इमारतीमध्ये वापरलेल्या स्टील उघडे पडून ते गंजलेले आहे. इमारतींच्या बाहेरील बाजूस अनेक ठिकाणी भिंतींना भगदाड पडले असून, ठिकठिकाणी भिंतीवर झाडे उगवली आहेत. इमारतीमधील भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत. दारेही खिळखिळी झाली आहेत. या इमारती धोकादायक झालेल्या असल्याने त्या केव्हाही कोसळू शकतात, अशी शक्‍यता गृहीत धरून इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पथकाने केलेल्या ऑडिटमध्ये संभाव्य धोके लक्षात आणून देण्यात आले आहेत.

इमारत कोसळून कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी महामंडळाच्या स्थापत्य विभागामार्फत इमारतीतील साधारण ८५ कुटुंबांना घर खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या, नोटिसा मिळूनही घरे खाली केली नाही; तर पुन्हा दुसरी नोटीस देण्यात येईल. त्यानंतर वीजपुरवठा, पाणीपुरवठा तोडण्यात येईल. संभव्य जीवितहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या शेजारील दोन आणि विभागीय कार्यालयाच्या मागील असलेल्या चार इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. इमारतींचे आयुष्य संपलेले असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.  - मीनल मोरे, विभागीय स्थापत्य अभियंता