वाहून जाणारे पावसाचे पाणी शोषखड्ड्यांमुळे जमिनीत

वाहून जाणारे पावसाचे पाणी शोषखड्ड्यांमुळे जमिनीत

उदगीर - शहर व परिसरात पावसाला सुरवात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. देवर्जन व हेर मंडळ विभागांत अधिक पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरवात झाली आहे. तालुक्‍यात गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सध्या जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाला आहे.

उदगीर तालुक्‍यात आत्तापर्यंत मंडळनिहाय झालेला एकूण पाऊस, असा उदगीर ९२, मोघा ११०, वाढवणा ८४, नळगीर ३९, नागलगाव २६, देवर्जन ९७, हेर १२० मिलिमीटर असा आहे. 

आतापर्यंत एकूण सर्वाधिक पाऊस हेर मंडळात १२० मिलिमीटर तर सर्वाधिक कमी पाऊस नागलगाव मंडळात २६ मिलिमीटर झाला आहे. देवर्जन, हेर व मोघा मंडळांतील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यांना प्रारंभ केला आहे. तालुक्‍यातील अनेक नदी-नाल्यांना पावसामुळे पाणी येत असून अनेक वेळा काही गावांतील शेतरस्ते बंद होत आहेत.

उदगीरमध्ये तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने शहरात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील नाले भरुन वाहत असून शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. 

शहरातील कृषी सेवा केंद्र व कृषी साहित्य विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. खते व बियाणे घेण्यासाठी शेतकरी एकच गर्दी करताना दिसून येत आहे. महाबीज या सोयाबीनच्या अनुदान असलेल्या बियाण्यांचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.

उदगीर शहरात महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शोषखड्डे मोहिमेमुळे पावसाचे वाहुन जाणारे पाणी शोषखड्ड्यांमुळे जमिनीत मुरताना दिसून येत आहे.

शहर व परिसरातील आणि शहरालगत असलेल्या मलकापूर, सोमनाथपूर, बनशेळकी, मादलापूर, निडेबन या गावालगतच्या वस्त्यांमध्येही खोदण्यात आलेल्या शोषखड्ड्यांमुळे वाहून जाणारे पावसाचे लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी उंचावण्यास मदत होणार आहे.

शोषखड्डे मोहीम प्रभावीपणे राबविणार
‘‘उदगीर शहर व परिसरात पडणारे पावसाचे पाणी व दररोजचे सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलयुक्त शिवारअंतर्गत सुरू केलेली शोषखड्डे मोहीम अधिक प्रभावीपणे राबविणार आहे. दिवसेंदिवस होत असलेली पावसाची अनियमितता व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी भूगर्भातील पाणीपातळी उंचावणे महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात येत आहे.’’ 
-डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com