महावितरणची वीजचोरांच्या विरोधात धडक मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महावितरणने वाढत्या वीज चोरीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. महिनाभरात औरंगाबाद व जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 46 लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. 708 ग्राहकांची वीज चोरी पकडून 19 जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

औरंगाबाद - महावितरणने वाढत्या वीज चोरीच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. महिनाभरात औरंगाबाद व जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 46 लाख रुपयांच्या वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. 708 ग्राहकांची वीज चोरी पकडून 19 जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

महावितरणच्या औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह जालना जिल्ह्यामध्ये वीज गळतीचे तीस ते चाळीस टक्के प्रमाण आहे. मोठ्या प्रमाणावर आकडे टाकून आणि रिमोटच्या साहाय्याने वीज चोरी केली जात असल्याने महावितरणची यंत्रणा त्रस्त झाली आहे. त्यामुळे महावितरणने वीज चोरांच्या विरोधात मोहीम सक्रिय केली आहे. 1 ते 25 सप्टेंबर दरम्यान धडक मोहिमेत 46 लाख 45 हजार रुपयांच्या 708 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. औरंगाबाद शहरात 59, ग्रामीण विभाग क्र. 1 व 2 मध्ये165 आणि कन्नड विभागात 319 चोऱ्या पकडण्यात आल्या; तर जालना जिल्ह्यात 165 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून तब्बल एक कोटी 32 लाख रुपयांची वसुली करण्यात आली. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील 19 चोरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजचोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, महावितरणच्या तांत्रिक कामगारांसह ऑपरेटर, शाखा अभियंता यांनाही कामाला लावण्यात आले आहेत. दहा हजार व त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 44 हजार 887 ग्राहकांकडे 150 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. 

जालना जिल्ह्यातील 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे थकबाकी व वीज चोरी असलेल्या 15 गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामध्ये अंबड तालुक्‍यातील वैतागवाडी, गोंदी तांडा, हसनापूर, अनसूयानगर, बाबानगर. मंठा तालुक्‍यातील नानसी तांडा, बाबूळ तांडा, बैलारा. परतूर तालुक्‍यातील रायपूर, वालखेड, शिरोडा, शिगोना, डौलारा, अंजलगाव आणि जाफराबाद तालुक्‍यातील कुसळी या गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे; तर औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पाच हजार 555 गावांच्या पथदिव्यांचे 254 कोटी 33 लाख रुपये थकबाकी असल्याने पैठण, सोयगाव, अंबड येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

Web Title: aurangabad news mseb