कामगारांच्या संतापापुढे समितीचा काढता पाय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

औरंगाबाद - एसटी कामगार वेतन करारापूर्वी कामगारांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या उपसमितीसमोर एसटी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला. काही कामगारांनी सातवा वेतन आयोग मिळावा ही, तर काहींनी करार करण्याची मागणी लावून धरली. दोन्ही बाजूंची भिन्न मते आणि वाढता संताप लक्षात घेता उपसमितीने काढता पाय घेतला. 

महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या वेतनाच्या अनुषंगाने दर चार वर्षांनी करार केला जातो. 20 डिसेंबर 2016 रोजी हा करार संपल्याने गेल्या काही दिवसांपासून वेतन कराराच्या मागणीसाठी महामंडळातील वातावरण ढवळून निघालेले आहे. नवीन करार 30 एप्रिल 2017 पर्यंत करण्याचे आश्‍वासन महामंडळाने दिले होते. मात्र मान्यताप्राप्त संघटनांकडून वेतनवाढीच्या अनुषंगाने ठोस प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे वेतन करार करण्यात अडचणी येत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. वेतन करारासाठी थेट कर्मचारी व कामगारांशी चर्चा करण्यासाठी महामंडळाने वाटाघाटी समिती स्थापन केलेली आहे. ही समिती राज्यभर दौरे करून कामगारांची मते जाणून घेत आहेत. 

या समितीमध्ये महाव्यवस्थापक माधव काळे हे अध्यक्ष आहे. नागपूर, अकोल्यानंतर समितीने गुरुवारी औरंगाबाद विभागाला भेट दिली. आगार क्र. दोनमध्ये कामगारांना बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. काही संघटनांनी सातवा वेतन आयोग देण्याची मागणी केली, तर काहींनी नियमित करार करावा अशी मागणी रेटून धरली. दोन्ही बाजूची भिन्न मते मांडण्यात येत असतानाच संताप अनावर झाल्याने कामगारांनी घोषणाबाजी सुरू केली. कामगारांतील अस्वस्थता वाढत असल्याचे पाहून उपसमितीने बैठक गुंडाळत काढता पाय घेतला.