ब्लॅकमेलिंग करणाऱ्या प्रियकराचा निर्घृण खून

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या प्रियकराचा निर्घृण खून

उमरगा - लग्नानंतरही प्रियकराकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगमुळे एका विवाहितेने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने त्याचा डोक्‍यात दगड घालून निर्घृण खून केला. रविवारी (ता. दोन) रात्री उशिरा घडलेली ही घटना सोमवारी (ता. तीन) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, उमरगा पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून अवघ्या पाच तासांच्या आत दोन युवकांसह एका विवाहितेस अटक केली.

शहरातील एकोंडी रस्त्यालगत असलेल्या पिस्के प्लॉटमध्ये मजुरीचे काम करणारा दशरथ देवीदास जमादार (वय २२) राहत होता. याच वस्तीत राहणाऱ्या भाग्यश्री विठ्ठल शिंदे (वय २१) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, भाग्यश्रीचे दोन महिन्यांपूर्वीच दुसऱ्या युवकासोबत लग्न झाले होते; मात्र लग्नानंतरही दशरथ भाग्यश्रीसोबत संपर्क करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता; परंतु भाग्यश्री त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे दशरथ ब्लॅकमेल करीत दोघांचे छायाचित्र दाखवून प्रेमप्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत होता. दरम्यानच्या काळात पिस्के प्लॉटमधीलच सिद्धेश्‍वर कल्याणी निलेकर (वय २८) याच्यासोबत भाग्यश्रीचे सूत जुळले होते. ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे भाग्यश्रीने सिद्धेश्‍वरला दशरथचा काटा काढण्याचे सांगितले.

रविवारी रात्री सिद्धेश्‍वर नवीन दुचाकीची पार्टी देतो, असे सांगून दशरथला सोबत घेऊन गेला. उमरगा-लातूर मार्गावरील आयटीआय कॉलेजच्या जवळील वीटभट्टीजवळ लक्ष्मण घोडके यांच्या पडीक जमिनीवर दशरथ, सिद्धेश्‍वर व त्याचा मित्र शेखर नागप्पा माळगे (रा. भीमनगर, उमरगा) या तिघांनी पार्टी केली. त्यानंतर जास्त दारू पिल्याने बेशुद्धावस्थेत असलेल्या दशरथच्या डोक्‍यात सिद्धेश्‍वरने दगडाने जबर मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दशरथला सोडून दोघांनी पळ काढला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोरेगाववाडीचे पोलिस पाटील लक्ष्मण पांगे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दशरथच्या मृतदेहाचे छायाचित्र व वर्णन व्हॉट्‌सअप ग्रुपवर पाठविले. त्यामुळे मृताची ओळख पटण्यास मदत मिळाली. दशरथची आई लक्ष्मीबाई यांनी तो सिद्धेश्‍वरसोबत गेल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, सिद्धेश्‍वर व शेखर काहीच केले नाही, या आविर्भावात परिसरात फिरत होते. पोलिस कर्मचारी लखन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, मोबीन शेख यांनी सिद्धेश्‍वरला बाजार समितीजवळून ताब्यात घेतले. तसेच शेखरलाही याच परिसरात शेतात मजुरीचे काम करीत असताना पोलिसांनी पकडले. तर भाग्यश्रीला घरातून ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com