हॉटेल संचालिकेची गळा चिरून हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

करमाड - दररोजप्रमाणे हॉटेल बंद करून हॉटेलच्या पाठीमागील खोलीत झोपी गेलेल्या हॉटेलच्या संचालिकेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (ता. तीन) मध्यरात्रीनंतर गाढेजळगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली.

ज्योती कानन नायर (वय ४०) असे हत्या झालेल्या हॉटेल संचालक महिलेचे नाव आहे.

मूळच्या केरळ येथील असलेल्या ज्योती नायर या महिलेचे जालना महामार्गालगत गाढेजळगाव फाट्याच्या पश्‍चिमेस गट क्रमांक ३३० मध्ये ‘ज्योती रेस्टॉरंट’ नावाचे हॉटेल आहे. गेल्या पंधरापेक्षा जास्त वर्षांपासून ही महिला स्वतः हे हॉटेल चालवीत होती. 

सोमवारी (ता.तीन) दररोजप्रमाणे रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास श्रीमती नायर यांनी हॉटेल बंद केले. त्यानंतर त्या  हॉटेलच्या पाठीमागील बाजूने असलेल्या आपल्या राहत्या खोलीत झोपण्यास गेल्या. मात्र, त्यानंतर खोलीवरील कौलारू काढत खोलीत प्रवेश करून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरण्यात आला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, कपाटात व बाजूला असलेल्या टेबलच्या ड्रावरमधील रोख रकमेसही हात लावला नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी हा फक्त खुनाचाच प्रयत्न असल्याचे करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले. घटनास्थळी आरोपींच्या चपलांचे दोन जोड, हॉटेल किचनमधीलच मिरची पुडीचा डबा आढळून आला. 

दरम्यान, मंगळवारी (ता. चार) सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या नजरेस ही घटना पडली. त्यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला असता श्रीमती नायर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेत गळा चिरला गेल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. दरम्यान, हॉटेलमधील दोन वेटर श्रीमती नायर यांचीच दुचाकी घेऊन गायब झाल्याचे कळाले. पोलिसांनी श्वान पथकामार्फत मार्ग काढला असता हॉटेल ते महामार्ग एवढाच माग श्वानाने दाखविला. 

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक (ग्रामीण) अशोक आमले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग आदींनी भेट देऊन श्री. चिखलीकर व त्यांच्या पथकाला काही सूचना केल्या. यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दुपारी चारच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ‘घाटी’ रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती अशोक आमले यांनी दिली.