रोजगाराचा दर उंचावल्यास महाशक्‍ती - निरूपमा राव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - तरुणांचा देश म्हणून भारताची जगभर ओळख निर्माण झाली असून ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ ही राष्ट्र नवनिर्माणाची ताकद आहे. भारतातील ३५ कोटी तरुणांनी देशाच्या रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्ती बनवावे, असे आवाहन माजी परराष्ट्र सचिव निरूपमा मेनन राव यांनी केले.

औरंगाबाद - तरुणांचा देश म्हणून भारताची जगभर ओळख निर्माण झाली असून ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ ही राष्ट्र नवनिर्माणाची ताकद आहे. भारतातील ३५ कोटी तरुणांनी देशाच्या रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्ती बनवावे, असे आवाहन माजी परराष्ट्र सचिव निरूपमा मेनन राव यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षान्त समारंभ मंगळवारी (ता. ३०) विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. या वेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर, डॉ. महेश शिवणकर, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मजहर फारुकी, डॉ. दिलीप खैरनार, डॉ. संजय साळुंके, वित्त व लेखाधिकारी शंकर चव्हाण उपस्थित होते.

श्रीमती राव म्हणाल्या, ‘‘एकविसावे शतक हे भारताचे म्हणून ओळखले जात आहे. ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड’नेदेखील भारत हा तरुणांचा देश असल्याचे म्हटले आहे. आजघडीला ३५ कोटी ६० लाख तरुण देशात असून देशाच्या प्रगतीत त्यांची भूमिका मोलाची असणार आहे. पदवी घेणाऱ्यात मुलींचे प्रमाण मोठे असून महाराष्ट्रात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. मराठवाड्याचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे.’’

निरूपमा राव यांनी या भागाच्या शैक्षणिक विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मिलिंद’ची स्थापना केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या विद्यापीठाची माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असून ज्ञान हीच सर्वोत्तम संपत्ती आहे, तिचे जतन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी १० विद्याशाखेतील ४५१ संशोधकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास निरूपमा राव यांचे पती सुधाकर राव, नलिनी चोपडे, डॉ. सतीश पाटील, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सर्जेराव ठोंबरे आदींची उपस्थिती होती. डॉ. हमीद खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. बीना सेंगर यांनी सूत्रसंचालन केले. 

पदवीदानानंतर सभागृह रिकामे
दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाचे नाट्यगृह खचाखच भरले होते. ४५१ पीएच. डी.धारकांना पदवीदान करण्यात आले. मंचावर पदवी स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. यामुळे कुलगुरूंचे अध्यक्षीय भाषण आणि श्रीमती राव यांच्या भाषणावेळी सभागृहातील ९० टक्‍क्‍यांहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या.

ट्रेंड सेंटरची ओळख मिळाली
युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरॅक्‍शन सेल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सारख्या प्रकल्पातून ‘ट्रेंड सेटर’ ही ओळख राज्यात निर्माण झाल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले. गुणवत्ता, नवोन्मेष, संशोधन या क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख कुलगुरूंनी केला.