भगव्याच्या नावावर बंगले बांधणारे आरक्षणप्रश्‍नी मुग गिळून गप्प का? 

राजेभाऊ मोगल
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

उद्धव यांनी आंदोलन करून दाखवावे! 
तुम्ही ज्यांच्यासाठी कित्येक वर्ष खर्च केले, ते मोर्चा निघाला तेव्हा समोरही आले नाहीत. तर शिवसेनेतून मराठा समाज बाजूला करीत उद्धव यांनी एक आंदोलन किंवा एक गाडी फोडून दाखवावी, असे आव्हान राणे यांनी दिले. तसेच आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदार, खासदाराने याप्रश्‍नांवर आवाज उठवलेला नाही. असे सांगत समाजाचा केवळ वापर करून घेत असल्याचे त्यांनी नमुद केले.

औरंगाबाद - प्रामाणिक, विश्‍वासू अशी मराठा समाजाची ओळख आहे. मात्र, परिस्थितीअभावी समाजातील मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. तुम्ही सोबत राहा, कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळवूनच दाखवू, असा विश्‍वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्‍त केला. ज्यांनी शिवाजी महाराजांच्या भगव्यावर बंगले बांधले ते आरक्षणप्रश्‍नी मुग गिळून गप्प का, मराठा मोर्चात हे राम आणि शाम कुठेच दिसले नाहीत, अशा शब्दांत ठाकरे बंधूवरही त्यांनी नाव न घेता जोरदार प्रहार केले. अजून किती दिवस अशांच्या मागे जाणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

"मराठा आरक्षण न्यायालयीन लढा' या विषयावर सोमवारी (ता. 11) तापडीया नाट्यमंदिरात आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. राणे म्हणाले, की नारायण राणे यांनी समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. मात्र, त्यात समाजकंटकांनी आडकाठी घातली. आता हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी माझी जबाबदारी वाढली आहे. समाज स्वाभिमानाने जगला पाहीजे, यासाठी आपण कायम समाजासोबत आहोत. समाजाची चिंता असल्यानेच आरक्षणप्रश्‍नी सतत बोलतोय. यापुढे दबाबगट तयार करावा लागेल. आपले राज्य आले की स्वराज काय असते, ते दाखवून देऊ, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील म्हणाले, की 4 लाख कुटूंबाची तलाठी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माहिती एकत्र करूनच समाजाला 16 टक्‍के आरक्षण दिले होते. असे असताना आता पुन्हा त्याची खात्री करून घेण्याची भाषा कशासाठी, आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. वेळ पाहीजे तर घ्या, मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक पासून ते पदव्यूत्तर शिक्षण मराठा समाजासह खुल्या प्रवर्गासाठी मोफत करा. दरम्यान, ज्येष्ठ विधीज्ञ के. जी. भोसले यांनी परिस्थितीअभावी शेतकऱ्यांची मुले चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते स्पर्धेत मागे पडत आहेत. समाजातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात लक्ष घातल्यास दिलासा मिळू शकतो, याकडे लक्ष वेधले. किशोर शितोळे यांनी आपल्या भाषणातून समाजाचे चित्र मांडले. मंचावर अभिजित देशमुख, परेश झिरपे, ऍड. अशोक मुळे, ऋचा शिंदे, प्रकाश गायकवाड, विकास थाले, गोविंद सावंत उपस्थित होते.