औरंगाबादेत दहा लाखांच्या जुन्या नोटा फेकल्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

जंगले यांच्या ओपन प्लॉट नंबर 79वरच्या एका झाडावर 500 आणि 1000 च्या नोटांचे बंडल एका पिशवीत भरून फेकून देण्यात आले होते.

औरंगाबाद : चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या दहा लाखांहून अधिक नोटा सिडको एन -2 कामगार चौकाजवळील जंगले यांच्या रिकाम्या भूखंडावर बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचे रविवारी (ता.11) निदर्शनास आले आहे.

जंगले यांच्या ओपन प्लॉट नंबर 79 वरच्या एका झाडावर 500 आणि 1000 च्या नोटांचे बंडल एका पिशवीत भरून फेकून देण्यात आले होते. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान या नोटा आढळून आल्यांने येथे बघ्यांची गर्दी जमली होती.

मुकुंदवाडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुषमा पवार, पोलीस कर्मचारी प्रवीण कापरे, एस. बी. सोहळे, माधुरी खरात यांनी घटनास्थळी जाऊन नोटा जप्त केल्या आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.