कॅरिऑनची जुनी तिन्ही परिपत्रके रद्द

कॅरिऑनची जुनी तिन्ही परिपत्रके रद्द

औरंगाबाद - अभियांत्रिकी पदवी आणि बी. टेकच्या कॅरिऑनबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यापूर्वी १९, २४ आणि २८ ऑगस्टला काढलेली तिन्ही परिपत्रके सोमवारी (ता. २०) रद्द केली आहेत. याबाबत विद्यापीठाने नव्याने परिपत्रक काढले असून कॅरिऑनअंतर्गत प्रवेश आणि परीक्षाबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे अनेक महाविद्यालये संलग्नित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्याबाबत विविध संघटनांनी कॅरिऑनची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता, कुलगुरूंनी विशेषाधिकारात कॅरिऑनची नियमावली तयार केली आहे.

नव्या नियमावलीनुसार अभियांत्रिकीच्या सर्वच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात, द्वितीय वर्षातून तृतीय वर्षात, तृतीय वर्षातून अंतिम वर्षात कॅरिऑनअंतर्गत तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. तसेच लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा, तसेच टेस्ट, टर्म वर्क पूर्ण करण्यासही पात्र समजले जाणार आहे; मात्र लगतच्या पुढील वर्गामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण वर्ग समाधानकारकपणे पूर्ण करावे लागणार आहेत.

विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण तर, प्रथम वर्षात अनुत्तीर्ण असल्यास विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. याचवेळी क्‍लास टेस्ट, टर्म वर्क पूर्ण करून घेतले जाईल; मात्र त्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचे प्रथम सत्राची लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार नाही. हे विद्यार्थी प्रचलित नियमाप्रमाणेच पात्र झाल्यानंतरच तृतीय वर्षाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा देऊ शकतील. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही अंतिम वर्षासाठी हा नियम लागू राहील.

कॅरिऑनच्या प्रक्रिया  २५ नोव्हेंबरपर्यंतच
कॅरिऑनच्या प्रवेश, परीक्षेच्या प्रक्रियेच्या कार्यवाहीसाठी २५ नोव्हेंबर अंतिम मुदत असून संबंधित विद्यार्थ्यांची वर्गनिहाय, अभ्यासक्रमनिहाय यादी विद्यापीठाकडे २७ नोव्हेंबरपर्यंत जमा करायची आहे. कॅरिऑनअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे टेस्ट, टर्म वर्क २८ नोव्हेंबरपर्यंत घेतले जाणार आहे. प्रशासकीय अथवा तांत्रिक कारणाने या कालावधीत शक्‍य होत नसल्यास लेखी परीक्षेचा अंतिम पेपर संपल्यापासून २० दिवसांच्या आत टेस्ट, टर्म वर्क घेतले जाणार आहे.

शिष्यवृत्तीबाबत  विद्यार्थीच जबाबदार
कॅरिऑनबाबत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहणार असून तसे हमीपत्र घेतले जाणार आहे. जे विद्यार्थी डिटेन झाले आहेत, त्यांना कॅरिऑनअंतर्गत पुढील वर्गामध्ये प्रवेश, परीक्षा देता येणार नाही. कॅरिऑनअंतर्गत प्रवेश, परीक्षेचा निर्णय विद्यार्थीच घेऊ शकणार आहे. या वेळी ते विद्यार्थी अंतर्गत टेस्ट, टर्मवर्क पूर्ण करू शकतात. याबाबत महाविद्यालयांनी सक्‍ती करू नये, असे परिपत्रकात म्हटले आहे. कॅरिऑनच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नियमित विद्यार्थ्यांसोबतच होत असल्याने अंतिम प्रक्रियेसाठी ७ डिसेंबरची मुदत दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com