बकाल उद्यानामुळे पर्यटकांची संख्या घटली

बकाल उद्यानामुळे पर्यटकांची संख्या घटली

पैठण - प्रसिध्द संत ज्ञानेश्वर उद्यान विकासाबाबत शासन सुरवातीपासूनच नकारघंटा वाजवत असल्यामुळे उद्यान विकासाचा पायाच खचला आहे. परिणामी निसर्ग सौंदर्य लाभल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या उद्यानात आधुनिकतेचा नवा एकही बदल केला गेला नसल्यामुळे पर्यटकांच्या सहलीतून लाखो रुपयांचे उत्पन शासनाला मिळवून देणारे हे उद्यान बकाल झाले आहे. साहजिकच पर्यटकांची संख्या घटली आहे. शासनाने यापुढे नवे बदल घडवून पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या मनोरंजनाच्या विविध योजना अमलात आणल्या नाहीत तर उद्यानाचा अंत होणे दूर नाही, असे चित्र समोर दिसत आहे.

पैठण येथे गोदावरी नदीवर जायकवाडी धरणाची निर्मिती करण्यात आल्यानंतर नाथसागर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा अधिक आनंद लुटता यावा म्हणून धरणाचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी धरणाच्या पायथ्याशीच संत ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती केली. विशेष म्हणजे १९७० ते १९७५ च्या काळात वृंदावन व म्हैसूर उद्यानाच्या धर्तीवर या उद्यानाची उभारणी झाली. त्यामुळेच आजही हे उद्यान निसर्गसौंदर्याचा खजिना बिकट अवस्थेतही टिकवून आहे. उद्यानात झुळझुळ पाण्याचे वाहणारे पाट, हिरवळीचे गालिचे, विविध जातींची झाडे आणि फुले, संगीताच्या तालावर पाण्याचे नृत्य पाहून पर्यटक भारावून जातात. अजून या उद्यानाच्या सौंदर्यात मोठी भर पडणे गरजेचे आहे. यासाठी विशेष निधी देऊनच उद्यान विकासाच्या योजनेला पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्व द्यावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा शब्दही ठरला व्यर्थ
उद्यानाच्या विकासासाठी शासकीय पातळीवर कधीच प्रयत्न झालेले नाहीत. उद्यान निर्मितीनंतर भरघोस उत्पन्न मिळत असल्यामुळे उद्यानाची आर्थिक बाजू सक्षम राहिली. यावेळी उद्यानातील सर्व बाबींसाठी खर्च करण्यासाठी उद्यानाचे उत्पन्न सोयीचे ठरले. त्यामुळे निधीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करावा असे कधी कुणाला वाटले नाही. परंतु आता ही परिस्थिती राहिलेली नाही. शासनाकडून निधी मिळाल्याशिवाय उद्यान विकसित होणे अवघड आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने उत्पन्नही घटले. यामुळे १५ दिवसाहून अधिक काळ उद्यानाची वीज बिलाची रक्कम थकीत झाल्याने अंधारात राहिले आहे. अजूनही बिलापोटी अधूनमधून अंधारात राहावे लागत असून, त्यामुळे उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पर्यटकांसाठीच्या स्वच्छतेच्या सुविधेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी आले असता त्यांनी पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला निधी देण्याचा माझा शब्द आहे, असा खास उल्लेख करून आश्वसन दिले परंतु अजूनही पदरात काही पडलेले नाही.

पालकमंत्र्यांच्या घोषणेचे काय?
जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे पैठण नगरपालिका प्राधिकरणाच्या निधीतून शहरातील शिवाजी महाराज चौकातील भूमिपूजनासाठी आले असता श्री. कदम यांच्याकडे उद्यानाची गंभीर परिस्थिती स्थानिक नेत्यांनी मांडली. त्यांनी उद्यानासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून ७० लाख रुपये देण्याची घोषणा केली; परंतु यानंतर हा निधी कधी आला व कुठे खर्च झाला, हे एक गौडबंगालच आहे. 

खासगीकरणात झाला होता विकास
शासनाने उद्यानाचे खासगीकरण करून पुणे येथील ग्लास फायबर इंड्रस्टीज (मोशी) या कंपनीला ११ वर्षाच्या करारावर चालविण्यास दिले होते. परंतु हा करार अकरा वर्षाच्या आतच संपुष्टात आला. खासगीकरणाच्या काळात ग्लास फायबर कंपनीचे प्रमुख राम सातव, राजू सातव यांनी सोयी-सुविधेसह मनोरंजन, आनंदासाठी उद्यानात बच्चेकंपनीसाठी गोलाकार रस्त्यावरून धावणारी ट्रेन, निवासासाठी बांबू हट्‌स, विविध खेळण्या, मेरी गो राउंड, कोलंबस व वॉटर पार्क, बैलगाडी, घोडे, संत ज्ञानेश्वरांनी भावंडांसह चालविलेल्या भिंतीचा इलेक्‍ट्रिक झुलता देखावा आदी मनोरंजनाच्या वस्तू, साहित्य येथे उभारले. त्यामुळे पर्यटक समाधानाने उद्यानाबाहेर पडत असत. परंतु आता येथे पाहण्यासारखे काहीच राहिलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com