पोलिस दलातून अमित स्वामी बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

औरंगाबाद - पिस्टल, काडतूस चोरी प्रकरणात निलंबित पोलिस कर्मचारी अमित स्वामी (वय २७, रा. भोईवाडा, मूळ गाव सोलापूर) यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुरुवारी (ता. १८) दिली. कर्मचाऱ्यावर गंभीर कारवाई झाली असली तरी पिस्टल आणि काडतूस चोरीचे गूढ अद्याप कायम आहे.

स्वामी हे मुख्यालयात नोकरी करीत होते. न्यायालयात सुरक्षारक्षक म्हणून त्यांची नेमणूक होती. त्यासाठी त्यांना पोलिस विभागाने सर्व्हिस पिस्टल व काडतुसे दिली होती. भोईवाडा येथून घर बदलून ते हनुमाननगर येथे किरायाने राहण्यासाठी जाणार होते. आठ जानेवारीला रात्री रिक्षातून जाताना त्यांच्या रिक्षाला आकाशवाणी येथे अपघात झाला. रिक्षा उलटल्यानंतर स्वामी यांच्या तोंडाला जबर जखम लागून ते रक्तबंबाळ झाले होते. या दरम्यान त्यांची पिस्टल व काडतुसे लंपास झाली होती. या प्रकरणात रिक्षाचालक अभिषेक रुद्राक्ष याच्याविरुद्ध हलगर्जीपणे रिक्षा चालवल्याप्रकरणी कारवाई झाली. दरम्यान, पिस्टल व काडतुसे गायब झाल्याचा प्रकार समोर आला. तेव्हापासून पिस्टल, काडतुसे गायब असून, ती अद्याप सापडलेली नाहीत. पिस्टल चोरी प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली. स्वामीविरुद्ध पोलिस विभागाने कठोर पावले उचलत निलंबन केले. त्यानंतर बडतर्फही केले; पण अजूनही स्वामी हे पिस्टलबाबत काहीही माहिती देत नाहीत. त्यांनी माहिती न दिल्यास अटक करा, अशी तंबीही पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

कारवाई होऊ नये म्हणून मंत्र्यांचा फोन
पिस्टल चोरी प्रकरणानंतर निलंबित झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांना एका मंत्र्याकडून फोन आला. स्वामी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करू नये, असा पवित्रा या मंत्र्याने घेतला होता, अशी माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

Web Title: aurangabad news police