पोलिस आयुक्तांच्या विलंबामुळे आमदार गेले निघून

मनोज साखरे 
बुधवार, 31 मे 2017

  • आमदार इम्तियाज जलील, संजय शिरसाठ गेले निघून 
  • ठाण्याच्या इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रम विलंब 
  • महापौरांसह नागरिकही तासभर ताटकाळले 

औरंगाबाद : लोकप्रतिनिधींच्या विलंबाचे अनेक किस्से समोर येतात. पण वेळेवर आलेल्या आमदार, महापौरांना चक्क तासभर वाट पहावी लागल्याचा प्रकार शहर पोलिसांच्या कार्यक्रमात घडला. पोलिस ठाण्याच्या नविन इमारतीच्या उद्धघाटनासाठी लोकप्रतिनिधींना बोलावले. ते वेळेवरही आले पण स्वतः पोलिस आयुक्तच नियोजित वेळेपेक्षा तासभर उशीरा आल्याने कार्यक्रमाचा बेरंग झाला, तत्पूर्वी त्रस्त एमआयएम व शिवसेनेचे आमदारांना पोलिस ठाण्याचे उद्‌घाटनाविनाच काढता पाय घ्यावा लागला. 

बेगमपुरा पोलिस ठाण्याचे बीबीका-मकबरा परिसरातील नविन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. रंगरंगोटी व सजावट झाल्यानंतर बूधवारी (ता. 31) सायंकाळी साडेचार वाजता उद्‌घाटन होते. या कार्यक्रमाला एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट, शहराचे महापौर भगवान घडामोडे तसेच माजी खासदार प्रदीप जैस्वाल आदींना बोलावण्यात आले होते. उद्‌घाटन कार्यक्रम सायंकाळी साडेचारला असल्याने वेळेवर पोचण्यासाठी इम्तियाज जलील यांनी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा केली. त्यावेळी पोलिस आयुक्त येत आहेत. आपणही त्वरीत या असा निरोप त्या अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच इम्तियाज जलील कार्यक्रमस्थळी पोहचले. आमदार संजय सिरसाट व महापौर देखील वेळेआधीच स्थानापन्न झाले होते. साडेचारची वेळ असतांना घड्याळात पाच वाजून वीस मिनिटे झाली, तरी पोलिस आयुक्त कार्यक्रमस्थळी आले नव्हते. विचारणा केल्यावर साहेब येतच आहे असा निरोप अधिकारी देत होते. महत्वाची कामे सोडून आलेल्या आमदार इम्तियाज जलील यांनी व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ संजय सिरसाटही निघाले. 

महापौर ताटकळले 
पोलिस आयुक्‍तांची वाट पाहून दोन्ही आमदार निघून गेल्यानंतर व्यासपीठावर महापौर भगवान घडामोडे व माजी खासदार प्रदीप जैस्वाल हे उपस्थित होते. साडेचार वाजेच्या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त यशस्वी यादव तासाभराने हजर झाले. त्यामूळे महापौरांना ताटकळत बसावे लागले. यानंतर पोलिस ठाण्याची फित कापण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. 

असाही अनुभव.. 
पोलिस आयुक्त म्हणून शहराचा पदभार स्वीकारल्यापासून यशस्वी यादव हे सार्वजिनक कार्यक्रम, जनता दरबार, पत्रकार परिषदेला तास, दोन तास उशीरानेच पोचतात असा अनुभव अनेकांना आला आहे. आता त्यांच्या उशिरा येण्याचा फटका चक्क आमदार महोदयांना बसल्याने शहरात मात्र या बाबीची चर्चा सुरू झाली आहे. 

मिटींग सोडून आलो होते..
सकाळपासून मला तीनवेळा उद्‌घाटन कार्यक्रमासाठी फोन आले. मी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा होकार दिला. कार्यक्रमाच्या काहीवेळा आधी फोन केला, त्यावेळी पोलिस आयूक्त साहेब आले आहे, तूम्ही लगेच निघा, असे सांगण्यात आले. मी लगेच निघालो व साडेचारला पोचलो. पाच वाजून वीस मिनिटे झाली, पण ते आलेच नाहीत. मी महत्वाची मिटींग सोडून आलो त्यामूळे मी निघून जाण्याचा निर्णय घेतला. संजय सिरसाट यांना कल्पना दिली, तेव्हा ते देखील निघाले. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला देखील बरीच कामे असतात, लोक त्यांच्या समस्या घेऊन भेटायला येतात. तेव्हा वेळेचे भान लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राखायला हवे. 
- इम्तियाज जलील, आमदार एमआयएम.