दुचाकी चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे सापळे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - दरदिवशी होणाऱ्या दुचाकी चोरीचा परिणाम गंभीर असून, नागरिकांना मोठा भुर्दंड बसत आहे. आता दुचाकी चोरींवर पायबंद घालून चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनोखी युक्ती आखली आहे. दुचाकी चोरीच्या परिक्षेत्रात पोलिसच आता पाळत ठेवणार असून, टॉप फाइव्ह ठिकाणी पोलिस सापळे रचून दुचाकी चोरांना पकडणार आहेत. 

औरंगाबाद - दरदिवशी होणाऱ्या दुचाकी चोरीचा परिणाम गंभीर असून, नागरिकांना मोठा भुर्दंड बसत आहे. आता दुचाकी चोरींवर पायबंद घालून चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी अनोखी युक्ती आखली आहे. दुचाकी चोरीच्या परिक्षेत्रात पोलिसच आता पाळत ठेवणार असून, टॉप फाइव्ह ठिकाणी पोलिस सापळे रचून दुचाकी चोरांना पकडणार आहेत. 

घरफोड्यांसोबतच चोरांचे सर्वांत जास्त लक्ष दुचाकी चोरींवर असून सततच्या दुचाकी चोऱ्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे लाख प्रयत्न चोरांनी हाणून पाडले असून, दुचाकी हातोहात लंपास केल्या जात आहेत. विशेषत: शहरातील बहुतांश भागांत चोरच दुचाकी लांबविण्यासाठी सापळे रचतात. 

खासकरून हॅंडल लॉक लावल्यानंतरही चोरांवर याचा कोणताही परिणाम पडत नसून काही मिनिटांतच दुचाकीसह चोर पसार होतात. चोरीच्या दुचाकींचा शोध घेऊन त्या मिळविण्याचे प्रमाण तुलनेत कमीच आहे. बहुतांश दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. जुन्या दुचाकी चोरी प्रकरणांचा तपास व दुचाकी चोरी होऊ नये यासाठी कसरत अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांवर भार आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नवीन उपाय योजला असून त्यामुळे पोलिसांच्या सापळ्यात चोर सापडतील.

डीबी पथकाची व्हावी पुनर्रचना
गुन्हे प्रगटीकरण शाखेकडून गुन्हे उकल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस खालावत आहे. ही बाब चिंताजनक असून ठाणेनिहाय पथकाची पुनर्रचना करून दुचाकी चोरी रोखण्यासाठी उपाय करण्यात यावेत.

टॉप फाइव्ह ठिकाणी सापळे
दुचाकी चोरीच्या ठिकाणे शोधून पोलिस अभ्यास करीत आहेत. टॉप फाइव्ह ठिकाणी गस्त घालून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दुचाकी चोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. याद्वारे गुन्हेगार, चोरांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

आपणही घ्या काळजी...
आपली दुचाकी रस्त्यावर कुठेही, असुरक्षित ठिकाणी पार्क करू नका. सुरक्षारक्षक असलेल्या पार्किंगमध्येच दुचाकी लावण्याला प्राधान्य द्यावे. दुचाकी बाजारपेठ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, महाविद्यालयांतून लंपास होतात. कमी कालावधीचे काम असल्यास नजरेस राहील अशा ठिकाणी दुचाकी लावणेही श्रेयस्कर ठरेल.