मुख्य रस्त्याच्या मधोमध खड्डे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पाटोदा - आधीच दुरवस्था असलेले शहरातील रस्ते यंदाच्या पावसाळ्यात अधिकच उखडले असून, मुख्य रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना मात्र याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. सबंधित विभागाची उदासीनता व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे.

शहरातील शिवाजी चौक येथून पाटोदा ते मांजरसुंबा हा रस्ता सुरू होतो. या रस्त्यावर पाटोदा ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या ठिकाणी नांदेड-पुणे या मार्गावरील वाहनांची चोवीस तास वाहतूक सुरू असते. सध्या या रस्त्यावरील डांबरी थर काही ठिकाणी पूर्णपणे निघून गेला आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे कसरतीचे काम झाले आहे. शहरामधून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची अनेक वर्षांपासून हीच अवस्था झालेली असून याकडे सबंधित विभाग; तसेच लोकप्रतिनिधी देखील जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याची चर्चा होत आहे. पाटोद्याच्या बाहेरील रस्त्याची अवस्थाही अशीच आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही वाईट स्थिती आहे. पाटोदा बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावरच खड्डे पडले, त्यातच पाटोदा तहसील कार्यालयासमोरही रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. सध्या पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी अक्षरशः तळे साठले आहेत. यातून मार्ग काढणे दुचाकीचालकांना मोठ्या अडचणीचे ठरत आहे.