करिअर कशातही करा, त्या क्षेत्रातून काय शिकतो हे महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - ‘‘कोणत्याही क्षेत्रात करिअर करा, प्रसिद्धीही मिळवा; मात्र त्या क्षेत्रातून आपण काय शिकतो हे महत्त्वाचे आहे,’’ असा सल्ला ‘सकाळ’च्या ज्युनिअर लीडर स्पर्धेअंतर्गत सहभागी झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी फेम’ बाल अभिनेता पुष्कर लोणारकर याने बुधवारी (ता. १२) दिला. 

औरंगाबाद - ‘‘कोणत्याही क्षेत्रात करिअर करा, प्रसिद्धीही मिळवा; मात्र त्या क्षेत्रातून आपण काय शिकतो हे महत्त्वाचे आहे,’’ असा सल्ला ‘सकाळ’च्या ज्युनिअर लीडर स्पर्धेअंतर्गत सहभागी झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी फेम’ बाल अभिनेता पुष्कर लोणारकर याने बुधवारी (ता. १२) दिला. 

अभिनेता पुष्करने बुधवारी शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्याने जयभवानी विद्यामंदिर, ज्ञानप्रकाश विद्यालय, शिशुविहार विद्यामंदिर, गुजराती कन्या विद्यालय, सोनामाता विद्यामंदिर, मुकुल मंदिर विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. जय भवानी शाळेत पुष्करचे बॅंड पथकाने स्वागत करण्यात आले. तो म्हणाला, ‘‘मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे; मात्र तुमच्यासमोर उभा राहून बोलताना एका वेगळ्याच विश्‍वात असल्याचा भास होतो आहे. तुम्हालाही माझ्यासारखे व्हावे वाटते  का? यासाठी भरपूर अभ्यास करा, अवांतर वाचन करा. आपण अभिनय क्षेत्रातून माणसे वाचायला शिकलो.’’ या वेळी जयभवानी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार, शोभा कासलीवाल, रजनी भालेराव, रामचंद्र बर्प, ज्ञानप्रकाश विद्यामंदिरचे एस. पी. जवळकर, मुख्याध्यापिका एस. पी. निंबोरकर-देशमुख, मुख्याध्यापक, सोनामाता विद्यामंदिरच्या विमल तळेगावकर, श्री. चव्हाण, शिशुविहार विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका उषा नाईक, सहसचिव सुलोचना नाईक, मंगल गायकवाड, दीपाली कळवणकर, गुजराती कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मयुरा पटेल, उपाध्यक्षा शिला हौजवाला, सदस्य अल्पा शहा, अजय पटेल, मुकुल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश परदेशी, संध्या सीमंत, सुनीता पाठक, अंजली कदम, विनोद राठोड यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.  

पुष्कर, तू अभ्यास कसा करतो?
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना पुष्करला विद्यार्थ्यांनी चित्रपटातील अनुभवासोबतच अनेक प्रश्‍न विचारले. तू कोणत्या वर्गात आहेस, तुझ्या शाळेचे नाव काय, चित्रपटातील डायलॉग म्हणून दाखव, तुझा आवडात चित्रपट, चित्रपटातील डायलॉग पाठ करायला किती वेळ लागला, यांसारख्या प्रश्‍नांचा त्यात समावेश होता. एका विद्यार्थिनीने ‘पुष्कर, तू अभ्यास कसा करतोस, या प्रश्‍नावर, सकाळी लवकर उठण्यापासूनची दिनचर्याच त्याने विद्यार्थ्यांसमोर मांडली. अभ्यासासोबतच खेळा असे समर्पक उत्तरही त्याने दिले.

पुष्कर एक सेल्फी तो बनता है
पुष्करसोबत संवाद साधताना विद्यार्थ्यांत चैतन्य निर्माण झाले होते. काय विचारू आणि काय नको अशी त्यांची अवस्था झाली होती. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्या हातात हात देण्यासाठी गर्दी केली. शिक्षक, शिक्षिकांनाही त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. या वेळी परिसरातील नागरिक पुष्करचा संवाद ऐकण्यासाठी आवर्जून शाळेत जमले होते. 

सर, नववीची पुस्तके आलीत का?
पुष्कर पंढरपूर येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तो बराच वेळ अभ्यासक्रमाविषयी विद्यार्थी, शिक्षकांशी बोलत राहिला. या वेळी त्याने आमच्याकडे अजून बदललेल्या नववीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके आली नाहीत, तुमच्याकडे आलीत का? असे जाणीवपूर्वक विचारले. यावर पुस्तके आली नसल्याचे सांगत तुला मिळाली का, अशी शिक्षकांनी त्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

ज्युनिअर लीडरमधून होतो व्यक्तिमत्त्वाचा विकास
पुष्कर लोणारकर म्हणाला, ‘सकाळ’ने सुरू केलेली स्पर्धा म्हणजेच आपल्यासाठी संधी आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, सामान्यज्ञान वृद्धिंगत होण्यासोबतच बुद्धीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या वयात असा प्लॅटफॉर्म मिळणे ही चांगलीच गोष्ट आहे.’’ या स्पर्धेत कसे सहभागी व्हायचे, त्यासाठी काय करायचे याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्‍नांना त्याने उत्तरे दिली. काही दिवसांत त्याने काम केलेला ‘चिसौका’ हा चित्रपट येणार आहे.