रेल्वेचे तीस जवान अन्‌ हद्द दीडशे किलोमीटरची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - रेल्वेच्या यंत्रणेच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) मनुष्यबळाचा प्रश्‍न सतावत आहे. अत्यंत तोकड्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुरक्षेचा भार वाढल्याने जवान ओझ्याखाली दबले आहेत. परिणामी, रेल्वेच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद - रेल्वेच्या यंत्रणेच्या सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) मनुष्यबळाचा प्रश्‍न सतावत आहे. अत्यंत तोकड्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुरक्षेचा भार वाढल्याने जवान ओझ्याखाली दबले आहेत. परिणामी, रेल्वेच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत राज्यासह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ मोठा आहे. पर्यटनाबरोबरच व्यापारी व उद्योगांच्या दृष्टीने या शहराला महत्व आहे. म्हणूनच या भागात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ‘ए’ दर्जाचे औरंगाबाद रेल्वेस्थानक आहे. दररोज साधारण चाळीस रेल्वेगाड्या या मार्गावरुन धावत आहेत. तर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बलासोबतच लोहमार्ग पोलिसांची नियुक्ती आहे. रेल्वे सुरक्षा बलावर रेल्वेच्या प्रवाशांची आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची महत्वाची जबाबदारी आहे. तर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणे ही लोहमार्ग पोलिसांची जबाबदारी आहे. औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बलाची हद्द बदनापूर रेल्वेस्टेशनच्या आऊटर सिग्नलपासून ते अंकाई किल्ल्याच्या आऊटर सिग्नलपर्यंत म्हणजे साधारण दीडशे किलोमीटरची आहे. 

गेल्या वीस वर्षात रेल्वेगाड्या वाढल्या, प्रवासी संख्या दहापटीने वाढली. असे असताना आजही सन २००२ मध्ये असलेल्या एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक, पंचवीस पोलिस जवान अशा तीस कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मुळात आजच्या रेल्वेगाड्या व प्रवासी संख्येसाठी ७० रेल्वेगाड्यांची गरज आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने वारंवार कर्मचारी वाढवण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र उपयोग झाला नाही. दररोज रेल्वेमध्ये होणारे गुन्हे लक्षात घेता, रेल्वे सुरक्षा बलाची अक्षरश: दमछाक होत आहे.

कॅमेऱ्यांची नजर कमकुवत
औरंगाबाद हे महत्वपूर्ण रेल्वेस्थानक असल्याने येथे सीसीटीव्हींची करडी नजर आवश्‍यक आहे. मात्र, सध्या असलेले सीसीटीव्ही कमी दर्जाचे असल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सध्या २६ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमाने चोऱ्या, गोंधळ, थुंकणारे, कचरा करणारे अशा विविध प्रवाशांवर नजर ठेवली जाते. सध्याचे कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने घटना टिपली जाते. मात्र, त्यातील चोरटा ओळखता येत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना शोधून काढण्यात अडथळे येत आहेत. रेल्वेच्या निर्भया निधीतून उच्च दर्जाचे कॅमेरे लावण्यासाठी नुकताच ६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याने येत्या काळात अत्याधुनिक असे साठ ते सत्तर कॅमेरे बसवले जाणार आहेत.

Web Title: aurangabad news railway RPF