पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पोटशुळ झालाः रावसाहेब दानवे

राजेभाऊ मोगल
सोमवार, 3 जुलै 2017

औरंगाबाद: रस्ते विकासाचे साधन आहेत. त्याशिवाय विकास कसा होणार, असा प्रश्‍न उपस्थित करीत समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात येणाऱ्या नेत्यांना पोटशूळ झाला, अशी टिप्पणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली. पश्‍चिम महाराष्ट्रात झालेल्या रस्त्याचा मोबदला हा एक पट दिला, तेव्हा कुणी बोलले नाही, इथे आम्ही पाचपट किंमत देत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

जालना लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण तालुक्‍यातील विकासकामांबाबत त्यांनी सोमवारी (ता. 3) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी श्री. दानवे यांना अनेक प्रश्‍न छेडले. समृद्धी महामार्गाच्या आंदोलनादरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येऊन गेले, त्यावर तुमची भुमिका काय, विरोधकांचे पोटदुखत आहे का, असा सवाल करण्यात आला. यावर ते म्हणाले, प्रश्‍नच नाही दुखत आहे. पुणे-कोल्हापूर महामार्ग केला. त्याबदल्यात एक पटच पैसे दिले. इथे आम्ही पाचपट देत आहोत. आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? विकासाच्या गोष्टी मराठवाडा, विदर्भात येऊ नये का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कर्जमाफीचे श्रेय शिवसेना जरा जास्त घेत आहे का, यावर शेतकरी आणि सरकारलाच श्रेय जात असल्याचे त्यांनी नमुद केले. यावेळी महापौर भगवान घडामोडे, बदनापुरचे आमदार नारायण कुचे, भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, विजय औताडे उपस्थित होते.