दीडशे कोटींतून शहरात होणार ५० रस्ते

दीडशे कोटींतून शहरात होणार ५० रस्ते

औरंगाबाद - शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरात करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या यादीची प्रतीक्षा संपली आहे. सोमवारी (ता. ३१) ५० रस्त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. शंभर कोटींऐवजी दीडशे कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव देण्यात आला असून, उर्वरित पन्नास कोटींच्या निधीसाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती भगवान घडामोडे यांनी दिली. या यादीमध्ये पूर्व, मध्य मतदारसंघाची छाप असून, त्याखालोखाल फुलंब्री, पश्‍चिम मतदारसंघातील रस्त्यांचा समावेश आहे. व्हॉईट टॉपिंग पद्धतीच्या सुमारे ५७.६२ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांचा नारळ आगामी महिनाभरात फुटेल, असे महापौरांनी स्पष्ट केले. 

शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी गेल्या महिन्यात शासनाने जाहीर केला होता. या निधीतून होणाऱ्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीसह जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात यावी, अशा सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या होत्या. मात्र, निधीच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये काही कलगीतुरा रंगला. त्यानंतर शहरातील कोणत्या भागातील रस्ते यादीत घ्यायचे यावरून भाजपमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला होता. त्यामुळे यादी रखडली होती. दरम्यान, सोमवारी महापौर घडामोडे यांनी दीडशे कोटींच्या रस्त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. घडामोडे म्हणाले, ‘‘शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, महापालिकेने दीडशे कोटींच्या रस्त्यांचे नियोजन करून शासनाकडे मागणी करीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘पीएमसी’ची (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नियुक्ती केली होती. त्यानुसार दीडशे कोटींच्या रस्त्यांची यादी देण्यात आली आहे. उर्वरित पन्नास कोटींचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करू; अन्यथा डिफर्ड (तीन टप्प्यांत पैसे देणे) पेमेंटवर ५० कोटींचे रस्ते करण्यात येतील. सुमारे ५७.६२ किलोमीटरटचे हे रस्ते असतील. यादी करताना मुख्य व वर्दळीच्या; तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यादी शासनाकडे जाईल, प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर आगामी महिनाभरात रस्त्याच्या कामाचा नारळ फुटू शकतो’’, अशी माहिती श्री. घडामोडे यांनी दिली.

अनेक गुळगुळीत रस्त्यांचा समावेश 
यादी तयार करताना काही नगरसेवकांना खूश करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी व सध्या गुळगुळीत रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यात बदल करण्यात येईल, या कामांच्या दोन निविदा काढण्याचे नियोजन असून, प्रशासकीय स्तरावर त्याचे नियोजन करण्यात येईल, असे महापौर श्री. घडामोडे यांनी सांगितले.

तनवाणींचा ‘रस्ता’ मोकळा, शिवसेनेला चकवा
रस्त्यांच्या यादीवर पूर्णपणे भाजप व शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचेच वर्चस्व आहे. फुलंब्री व पूर्व या दोन विद्यमान भाजप आमदारांच्या मतदारसंघातील अनुक्रमे नऊ आणि १५ रस्त्यांचा समावेश केला आहे; परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे सध्या ‘एमआयएम’चा आमदार असलेल्या मध्य मतदारसंघातील सर्वाधिक १८ रस्त्यांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. या मतदारसंघातून गतवेळी पराभूत झालेले किशनचंद तनवाणी भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे तनवाणी यांनी आपला ‘रस्ता’ मोकळा करून घेतला आहे. यादीत शिवसेनेला ‘चकवा’ देण्यात आला आहे. पश्‍चिम मतदारसंघात संजय शिरसाट हे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील केवळ आठ रस्त्यांचा समावेश यादीत करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com