साई अभियांत्रिकीचे प्रवेश थांबवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

औरंगाबाद - चौका येथील साई अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांनी गुण वाढीसाठी अभियांत्रिकीचे पेपर सुरेवाडी येथील नगरसेवकाच्या घरी सोडविल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला. या प्रकरणी साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने वर्ष 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश थांबावेत, असे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयाच्या प्रशासनाला पाठविले आहे. याच आशयाचे पत्र डायरेक्‍टर टेक्‍निकल एज्युकेशन (डीटीई) विभागालाही दिले आहे, अशी माहिती कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी सोमवारी (ता. पाच) दिली.

साई अभियांत्रिकी प्रकरणी विद्यापीठाने महेंद्र शिरसाट, प्रवीण वक्‍ते, साधना पांडे यांची त्रिसदस्य समिती स्थापन केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. विद्यापीठातर्फे महाविद्यालयास सलग्नता का रद्द करू नये, याचा खुलासाही साई अभियांत्रिकीकडून मागविला आहे. महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेऊ नयेत. शिवाय प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे पत्रात नमूद आहे. या प्रकरणी या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यानंतर तो पोलिसांना देणार असल्याचेही कुलगुरू चोपडे यांनी सांगितले.