साई अभियांत्रिकीला विद्यार्थ्यांनी ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या "ईबीसी'चे निम्मे पैसे महाविद्यालयास मिळाले आहेत. उर्वरित मंजूर रक्‍कम महाविद्यालयास मिळाल्यानंतर मुळ कागदपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात येतील. कागदपत्रे तत्काळ हवी असतील तर, त्यांनी उर्वरित रक्‍कम पदरमोड करुन भरावी, त्याची महाविद्यालयातर्फे पावती देण्यात येईल. "ईबीसी'ची उर्वरित रक्‍कम मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेले पैसे परत मिळतील.
- जे. के. जाधव, संस्थाचालक, साई अभियांत्रिकी महाविद्यालय, परदरी, औरंगाबाद.

'ईबीसी'ची रक्‍कम जमा न झाल्यामुळे महाविद्यालयाने अडवली मुळ कागदपत्रे

औरंगाबाद : मुळ कागदपत्रे देण्यास साई अभियांत्रिकी महाविद्यालयाने नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) महाविद्यालयास टाळे लावले. "ईबीसी'ची निम्मी रक्‍कम जमा न झाल्याने महाविद्यालय अडवणूक करत असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.

ईबीसीच्या निम्म्या रकमेसाठी विद्यार्थ्यांची अडवणुक करु नका, विद्यार्थ्यांना मुळ कागदपत्रे तत्काळ देण्यात यावीत, याबाबतचे निवेदन देण्यासाठी विद्यार्थी प्राचार्यांकडे गेले. मात्र, निवेदन स्विकारायला आणि पोचपावती द्यायला प्राचार्यांनी नकार दिला. याचवेळी काही विद्यार्थ्यांना पैसे भरल्याची पावती मिळत नसल्याने आक्रमक होत महाविद्यालयास टाळे ठोकले. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर प्राचार्यांन निवेदन स्विकारत, पोचपावती दिली.

विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात, तंत्रशिक्षण कार्यालयातर्फे 58 लाख 68 हजार 240 रुपयांपैकी 50 टक्के रक्‍कम महाविद्यालयास जमा झाली आहे. उर्वरीत रक्‍कमही जमा होईल, त्यासाठी विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुसकान करु नका. तसेच विद्यार्थ्यांची मुळ कागदपत्रे तत्काळ परत करा. निवेदनावर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे श्री साई सामाजिक विकास संस्थेचे साई अभियांत्रिकी महाविद्यालय, परदरी, औरंगाबाद या पदवी अभ्यासक्रमाच्या विना अनुदानित संस्थेतील 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्‍के प्रमाणे 58 लाख 68 हजार 240 रुपये मंजूर झाले आहेत. संचालनालयाकडून अनुदान कमी मंजूर झाल्यामुळे मंजूर रकमेच्या 50 टक्‍के म्हणजे 29 लाख 34 हजार 120 रुपये देण्यात येत आहेत. असे पत्र तंत्रशिक्षणच्या विभागीय कार्यालयाकडून 18 सप्टेंबरला महाविद्यालयास देण्यात आले आहे.

परीक्षेवेळीही केली अडवणूक
अभियांत्रिकीचा निकाल लागला तरी, महाविद्यालय मुळ कागदपत्रे देत नाही. यापुर्वी परीक्षा शुल्क बाकी असलेल्या विद्यार्थ्यांकडून ऐन परीक्षेत उद्या पैसे भरतो, असे लिहून घेतल्यानंतर परीक्षेस बसू दिले होते. ईबीसीचे पत्र आम्हीच तंत्रशिक्षण कार्यालयातून आणल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.

Web Title: aurangabad news Sai Engineering student ebc amount