'समृदधी'ला मानवी चेहरा नसल्याने जनक्षोभ- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

राज्यातील पुनर्वसना संदर्भातील अनुभव वाईट आहेत. 1952 साली कोयना धरण झालं. त्यांना आता जमिनी मिळाल्या आहेत.

औरंगाबाद : आमचा कुठल्याही विकासाला विरोध नाही. मात्र, त्याला मानवी चेहरा असावा. ज्या विकासाला मानवी चेहरा नाही, तो विकास काय कामाचा, असा प्रश्न उपस्थित करत 'समृदधी महामार्गाला मानवी चेहरा नसल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. ती भावना येथे दिसली,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी व स्थानिक प्रतिनिधींशी पवार यांनी संवाद साधला. 

"समृद्धी महामार्ग प्रकल्पगस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी, व राज्य सरकार यांच्यात आपण चर्चा घडवून आणणार आहे. सध्या तीन महामार्ग असताना हा चौथा मार्ग कशासाठी? जुन्या मार्गाची दुरुस्ती, यांसह अन्य काही पर्याय शोधण्याबाबत विनंती करण्यात येईल."

राज्यातील पुनर्वसना संदर्भातील अनुभव वाईट आहेत. 1952 साली कोयना धरण झालं. त्यांना आता जमिनी मिळाल्या आहेत. ज्यांचं 4 वर्षांपूर्वी पुनर्वसन झालं. आता त्यांच्याच जमिनी पुन्हा समृद्धी महामार्गामध्ये जात आहेत. पुनर्वसनाचा अनुभव चांगला नाही. लोक उगाचच विरोध करत नाहीत, असे पवार यांनी सांगितले.