‘आजीं’ची प्रतीक्षा, ‘माजीं’चे नेतृत्व

‘आजीं’ची प्रतीक्षा, ‘माजीं’चे नेतृत्व

औरंगाबाद - जिल्ह्यातील राज्य मार्गासह प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवा अशी मागणी करीत शिवसेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागावर सोमवारी (ता. २०) मोर्चा काढण्यात आला. आजी आमदार, खासदारांची वाट पाहून तब्बल नियोजित वेळेपेक्षा सव्वा तास उशिराने माजी आमदार, खासदार तथा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात कोकणवाडी येथून मोर्चाला सुरवात झाली. पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार संजय सिरसाट यांच्या संपर्क कार्यालयापासून निघालेल्या या मोर्चात ते स्वत:च थेट बांधकाम भवनमध्ये आले, तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरवात केली आहे, मात्र शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. खड्ड्यांवरून श्री. पाटील यांना घेरण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. कोकणवाडी येथून सकाळी अकराला मोर्चा निघाला. हे ठिकाणी आमदार शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयापासून अगदी जवळच आहे; मात्र सव्वाबारापर्यंत वाट पाहूनही आमदार, खासदार न आल्याने वाट पाहून मोर्चा मार्गस्थ झाला. यानिमित्ताने शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा मोर्चेकऱ्यांमध्येच सुरू होती. मोर्चा बांधकाम भवन येथे पोचल्यानंतर शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले. दरम्यान, कार्यकर्ते पांगल्यानंतर एकच्या सुमारास आमदार शिरसाट तिथे दाखल झाले आणि शिष्टमंडळात सहभागी झाले. 

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पदमपुरा येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. तत्पूर्वी, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. ‘रस्त्यावरील खड्डे बुजवा’, ‘बांधकाम विभाग हाय हाय’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यानंतर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, सभागृहनेते विकास जैन, अनिल पोलकर, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक आनंदीताई अन्नदाते, शहर संघटक रंजना कुलकर्णी यांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘जिल्ह्यातील राज्य व जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, थातूर मातूर खड्डे बुजवू नयेत. तांत्रिकदृष्ट्या योग्यपद्धतीने खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा शिवसेनेतर्फे याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू,’ असा इशारा या वेळी देण्यात आला.

वेळोवेळी आढावा घेत असतो - खैरे
खासदार चंद्रकांत खैरे यांनी याविषयी सांगितले, की रस्त्यांसंदर्भात या खात्याच्या वरिष्ठांशी मी वेळोवेळी बैठक घेऊन आढावा घेत असतो. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढल्याने अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यासाठी मी जाणे सयुक्तिक ठरले नसते. हे काम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे मी मोर्चाला दांडी मारली या चर्चेला काहीच अर्थ नाही.

विद्यापीठात गेल्याने उशीर - शिरसाट 
आमदार संजय शिरसाट म्हणाले, की बालदिनानिमित्त विद्यापीठात कार्यक्रम होता. ऊसतोड मजुरांच्या मुलांशी संवाद साधण्यासाठी मी गेलो होतो, त्यामुळे मला येण्यासाठी उशीर झाला. मी थेट बांधकाम भवनात पोचलो; पण तोपर्यंत आंदोलन संपले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com