मध्यरात्री नेमकं काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरणाच्या मैदानावर सुरू असलेल्या कबड्डीच्या डे-नाईट सामन्यात रविवारी (ता. २७) मध्यरात्री महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश संघाच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. सुरवातीला झालेल्या धक्काबुक्कीचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले आणि तब्बल १५ राज्यांतून आलेल्या लहान-मोठ्या १२०० खेळाडूंची पळापळ झाली. नेमकं काय घडलं, याचा हा आँखोदेखा वृत्तांत.

औरंगाबाद - भारतीय खेळ प्राधिकरणाच्या मैदानावर सुरू असलेल्या कबड्डीच्या डे-नाईट सामन्यात रविवारी (ता. २७) मध्यरात्री महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश संघाच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. सुरवातीला झालेल्या धक्काबुक्कीचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले आणि तब्बल १५ राज्यांतून आलेल्या लहान-मोठ्या १२०० खेळाडूंची पळापळ झाली. नेमकं काय घडलं, याचा हा आँखोदेखा वृत्तांत.

स्टुडंट्‌स ऑलिंपिक असोसिएशनतर्फे ‘साई’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानांवर शुक्रवारपासून (ता. २५) आंतरराज्य क्रीडा स्पर्धा खेळवल्या जात होत्या. असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रदीप भारद्वाज यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की ‘साई’च्या मैदानावर रविवारी सुरू असलेल्या कबड्डी सामन्यांत महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी कोर्टमध्ये आलेल्या उत्तर प्रदेशच्या खेळाडूला पकडले. त्याने दम तोडताच यांना गुण मिळाला; मात्र यातील एकाने बाद खेळाडूची मान पकडून त्याला दाबले. खाली पडलेल्या खेळाडूने उठून दाबणाऱ्याला धक्का दिला आणि वाद सुरू झाला. रेफ्रीने मध्यस्थी करून ते मिटविले; मात्र उस्मानाबादच्या एका खेळाडूने रागाच्या भरात बाहेरून लोखंडी सळई आणून प्रशिक्षक अनिल शर्मा यांच्यावर उगारली. हे पाहताच उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी गोंधळ सुरू केला. सळई उगारणारा मैदानाबाहेर पळाला. त्याला पकडून आणण्यासाठी दोघे धावले. महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी पुन्हा मागून पळत जाऊन त्या दोघांना धरून बदडले. किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. काहींनी पोलिसांना फोन केले. ‘साई’चे संचालक वीरेंद्र भांडारकर आणि गस्तीवरील पोलिसांनी धाव घेऊन प्रकार मिटविला. जखमी खेळाडूंवर उपचार करवले आणि सर्वांना शांतपणे वसतिगृहात परतण्याचे आवाहन केले. 

अन्‌ घोषणांनी घाबरवले
सर्व खेळाडू गटागटाने परत आपापल्या होस्टेलकडे निघाले. धुमसत असलेल्या वातावरणात पाठीमागून उस्मानाबादच्या खेळाडूंनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा द्यायला सुरवात केली आणि उत्तर प्रदेशचे खेळाडू घाबरले. या धांदलीत बिथरलेल्या हरियानाच्या खेळाडूने समोर पळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या बास्केटबॉल कोच फारुख याला मागून ठोसा लगावला. फारुखने खाली पडताच आरोळी ठोकली आणि बाकीची मुले ओरडत पळायला सुरवात झाली. महाराष्ट्र आणि गोवा संघांचे खेळाडू मारण्यास येत असल्याची अफवा बराकीपर्यंत आली आणि तिथे थांबलेल्या ४०० मुलांनी मिळेल ते सामान गुंडाळून, असेल त्या कपड्यांनिशी, जिवाच्या आकांताने बराकीतून पळ काढला.