हरल्यावर इतके हताश लोक कधी पाहिले नाहीत- सुप्रिया सुळे

हरल्यावर इतके हताश लोक कधी पाहिले नाहीत- सुप्रिया सुळे

औरंगाबाद  : छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करतात या जिल्ह्यात कुणी संघटनेला वेळ देत नाही. पक्षाची वाट लावली असून सगळेच गोड बोले आहे. आता अजित दादा, सुनिल तटकरे येथे येतील तेव्हा हार तुरे होतील आऊटपुट काय तर शुन्य. असेच राहत असेल तर टाळे लावा या बिल्डींगला (राष्ट्रवादी भवन) आत्ताचे सत्ताधारी आपल्या विरोधात पंधरा वर्षे लढले तरीही ते जगले ना. सत्तेच्या मागे धावून काय काम करायचे. निवडणुक हरल्यानंतर इतके हताश स्त्री-पुरुष मी कधी बघितले नाही. आपण लोकांपर्यंत जाण्यात कमी पडले अगदी वरपासून तर खालपर्यंत हे कबुलच करायला हवे अशी कानउघडणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदास सुप्रिया सुळे यांनी औरंगाबादेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. 

राष्ट्रवादी भवन मध्ये गुरुवार (ता.24) शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतिष चव्हाण, काशिनाथ कोकाटे, ख्वाजा शरफोद्दीन, मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्यासह विविध सेलचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी किरकोळ तक्रारी, पदाधिकारी इतर पक्षात गेले. कार्यक्रमांचे आम्हाला निरोप मिळत नाही. बैठक चालु असतांना उठून जाणे यावरुन सुप्रिया सुळे या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या. बैठीनंतर त्यांनी मार्गदर्शन करतांना अतिशय कडक शब्दात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची खरपडट्टी काढली. 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, इलेक्‍शन हरल्याने पक्षात स्मशान शांतता आहे. येथे इतके हताश झालेले लोक मी कधी बघितले नाही. पराभव झाल्याचे इतके दुर्देव मानुन कसे चालेल. अमिताभ बच्चनचे चित्रपट सुद्धा फ्लॉफ झाले मात्र त्यांनी कधी हार मानली का? पवार साहेब काही रडत बसले का ? पवार साहेबांनी एकदा नव्हे तर तीनदा संघटना यशस्वीरित्या बांधून चालविली. संघटनेचे विचार एकनाने चालते. संघटनेचे काम हे नाती जोडण्याचे आहे. असेच बसून राहिलात तर तुम्हाला आणखी 25 वर्षे लागतील. आपण लोकांपर्यंत जाण्यात कमी पडतो आहोत. आपले लोक आंदोलनात वेळेवर पोहचत नाही. त्यांना उन्ह लागते. कपडे खराब होतात. उन आहेत म्हणून गॉगल लागतो. त्यांना खाली बसावेसे वाटत नाही. जुन्या पिढीने पक्ष वाढविला आत्ताच्या व्हॉट्‌सअप पिढीला तर काहीच देणे घेणे नाही. विद्यार्थी व युवक आघाडी काहीच काम करत नाही त्यांचे सगळ्यात वाईट काम दिसते. आंदोलन करण्यासाठी गर्दीची गरज नाही दो व्यक्ती सुद्धा आंदोलन करु शकतात. ज्याला संघटनेत काम करायचे आहे तो कशाची ही परवा न करता काम करत राहतो. या जिल्ह्यात संघटनेला कुणी वेळ देत नाही पक्षाची वाट लावली आहे. 

ही मीटिंग आहे वेटींग रुम नव्हे 
बैठक सुरु असतांना अनेक कार्यकर्ते उठून जात होते तर काही कार्यकर्ते खुर्च्यांवर येऊ बसत असल्याचे बघून सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच फटकारले. ही मिटींग आहे वेटींग रुम नाही. आमच्या जिल्ह्यात लोक सहा-सहा तास बैठकीत बसतात. तुम्ही सिरीयस नाहीत म्हणून तुमच्या जिल्ह्यात पक्ष वाढत नाही. ज्यांना जायचे असेल त्यांच्यासाठी दार उघडे आहे. काम करायचे असेल तर शिस्तीत करावे. 

जे पक्षातून गेले त्यांना शुभेच्छा 
सत्तेच्या मागे धावू नका सत्ता येते जाते. आता 2019 फार लांब नाही. सर्वे जण तयारीला लागा. दिवसाच्या 24 तास आमची निवडणुकीसाठी तयारी आहे. जे पक्षातून गेले त्यांना शुभेच्छा. ते आता आमदार ही असलतील पुढे राहतील याची शाश्‍वती देऊ शकता का? 

ताई ते भाजप मध्ये गेले 
बैठकीक प्रत्येक सेलच्या अध्यक्षांकडून आढावा घेण्यात येत असतांना काही सेलचे पदाधिकारीच नियुक्त केले गेले नसल्याची बाब समोर आली. सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष आहे का हे विचारल्यावर "ताई ते भाजप मध्ये गेले' असे एका कार्यकर्त्यांने सांगितले. तर फुलंब्री तालुक्‍यातील अनेक महिला भाजप मध्ये गेल्याने येथे महिला तालुका अध्यक्ष मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com