सात हजार स्वच्छतागृहे गेली कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात बांधण्यात येत असलेल्या सात हजार स्वच्छतागृहांचे काम नेमके कुठे सुरू आहे, आमच्या वॉर्डात मागणी करूनही अधिकारी प्रस्ताव मंजूर करत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यानंतर महापौर भगवान घडामोडे यांनी याप्रकरणी निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व स्वच्छतागृहांच्या कामांची माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, असे आदेश गुरुवारी (ता. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा (नागरी) आढावा घेण्यासाठी प्रशासनाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवला होता. यावेळी नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. गजानन बारवाल, शेख समिना, संगीता वाघुले, विकास एडके, चेतन कांबळे, माधुरी अदवंत, भाऊसाहेब जगताप, अफसर खान, नंदकुमार घोडेले, सायली जमादार यांनी योजनेच्या कामावर आक्षेप घेतला. अफसर सिद्दिकी यांनी शहरात सात हजार 997 स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून, त्यानुसार लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. चार हजार 550 स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाच्या वतीने मोठ-मोठे आकडे देण्यात येत आहेत, मात्र आमच्या वॉर्डातील प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. नेमके कामे कुठे सुरू आहेत, काही ठिकाणी दुसरा हप्ता देण्यात आलेला नाही. 30 जुलैपर्यंत उद्दिष्ट कसे पूर्ण करणार, लाभार्थींकडे पैशांची मागणी केली जाते, असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर खुलासा करताना आयुक्त म्हणाले, जे अर्ज शिल्लक असतील, त्यांची छाननी करायची आहे. सात हजार हे पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट होते. पुणे महापालिकेने 40 हजार स्वच्छतागृह बांधले. आपणही 30 हजार स्वच्छतागृह बांधू शकतो. 35 ठिकाणचे सार्वजनिक स्वच्छतागृह खराब झाल्याने वापराविना बंद आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून हे काम करण्यासाठी दीड कोटींची तरतूद करण्याची मागणी आपण केली आहे. काही संस्थाही स्वच्छतागृह बांधून देण्यास तयार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतरही सदस्यांचे समाधान झाले नाही. 

चौकशीनंतर दोषींवर कारवाई करा 
शहर पाणंदमुक्त करण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्याशिवाय शासनाकडून यापुढे निधीही मिळणार नाही. असे असताना प्रशासन गंभीर नाही. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून आयुक्तांनी कारवाई करावी, वॉर्ड अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यासाठी सकाळी पाच ते आठ या वेळेत वॉर्डात फिरून एखाद्या चळवळीप्रमाणे काम करावे, नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भगवान घडामोडे यांनी केले.