नाही म्हणणार 'वंदे मातरम'; देशाबाहेर काढून दाखवा: स्वामी अग्निवेश

राजेभाऊ मोगल
शनिवार, 29 जुलै 2017

देशभरात गोरक्षेच्या नावावर होत असलेले हल्ले, जमावाकडून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 28) दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर श्री. अग्निवेश, अलामा तौकीर रजा, शायर इम्रान प्रतापगडी, प्रा. प्रदीप सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व धर्मीयांनी रक्‍त सांडले आहे. त्यामुळे सर्वांनाच येथे राहण्याचा हक्‍क आहे. सध्या वंदे मातरम म्हणा, नाही तर देश सोडा, असे इशारे दिले जात आहेत. मी, नाही म्हणणार वंदे मातरम, मला देशाबाहेर काढून दाखवा, असे आव्हान स्वामी अग्निवेश यांनी हिंदूत्ववाद्यांना दिले. तसेच देशभक्‍तीचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

देशभरात गोरक्षेच्या नावावर होत असलेले हल्ले, जमावाकडून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 28) दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर श्री. अग्निवेश, अलामा तौकीर रजा, शायर इम्रान प्रतापगडी, प्रा. प्रदीप सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी श्री. अग्निवेश बोलत होते. ते म्हणाले, हवा, पाऊस, सूर्य यांना सर्वकाही समान आहे. मग, व्यक्‍तींना उच, निच का समजले जाते. हे बंद करून सर्वांना समानतेचा अधिकार हवा. या देशात निरपराध व्यक्‍तींना मारले जाते. अशी कृत्ये करणाऱ्यांना का शिक्षा होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. नाटकबाजी, बयाणबाजी बंद करून अशांना लाल किल्यासमोर उलटे लटकवा, मग आम्ही समजू की तुम्ही इमानदार आहात. येथील मुस्लिम देशभक्‍त आहेत. तसे नसते तर 20 कोटी मुस्लिम इसिसमध्ये भरती झाले असते. मंदिर वही बनाएंगे, म्हणतात, राम मंदिर तोडून मस्जिद बनविल्याचे सांगतात. असे असेल तर कुणीच का नोंदी करून ठेवल्या नाहीत. रामांचा जन्म कधी झाला, याचा अडवाणींकडे पुरावा आहे का, मंदिरचे बांधण्याचे प्रयत्न करू नका. मंदिर बांधाल, पण देश तुटेल.

तुमच्या इशारावर कदापीही वंदे मातरम म्हणणार नाही. भारत माता की जय म्हणा, अन्यथा तुम्ही देशद्रोही, असे प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण, भाजपावाल्यांनो, हे बंद करा, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. प्रा. प्रदीप सोळंके म्हणाले, तथाकथीत हिंदूत्ववाद्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सोयीने मांडत हिंदू -मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले. सतत शिवाजी महाराज कसे मुस्लिम विरोधी होते, हे रंगून सांगण्याचे काम झाले. मात्र, आता समाज जागरुक झाल्याने शिवाजी महाराज हे कधीच मुस्लिम नव्हे तर स्वराज्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृतीच्या विरुद्ध होते, हे कळाले आहे.'' अलामा तौकीर रजा यांनी तथाकथित गोरक्षक विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष करून निष्पाप व्यक्तींचे कसे जीव घेत आहेत, हे सांगीतले. इम्रान प्रतापगडी यांनी सद्य:स्थितीवर आधारित शायरी सादर करीत समारोप केला. जीवंत राहायचे असेल तर बोलावेच लागेल, प्रत्येक दहशतवादी मुस्लिमच का, असे म्हणता, तर मग अशावेळी सर्वाच्च न्यायालयातून निर्दोष मुक्‍तता होणाराही मुस्लिमच का असतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विभागीय उपायुक्‍त महेंद्र हरपाळकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी आमदार, माजी मंत्री, नगरसेवक, मुस्लिम समाजातील सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सहभागी होते. यादरम्यान, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.