स्वॅप मशीनद्वारे भरून घेणार वाहतूक दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ई-चालान डिव्हाईस म्हणजे काय?
ई-चालान डिव्हाईस बस वाहकाकडे असलेल्या मशीनसारखे आहे. ते मोबाईलच्या आकाराचे मशीन आहे. छोटे प्रिंटर यात असून त्यातून पावती मिळते. सहज हाताळता येईल, असे हे डिव्हाईस असून टच स्क्रीन व नंबर पॅडची सुविधा आहे. मशीनचा लॉग-ईन आयडी व बक्कल नंबर व पासवर्ड टाकल्यासच ते कार्य करते. कार्ड स्वाईपची सोय व कॅमेराही आहे. 

औरंगाबाद - जिल्ह्यात प्रवास करतेवळी वाहतूक नियम मोडला तर पैसे नाहीत असे म्हणून कलटी मारण्याची क्‍लृप्ती आता चालणार नाही; कारण पैसे नसेल तर भाऊ एटीएम कार्ड काढा अन्‌.. स्वॅप करून दंड भरा असेच निर्देश तुम्हाला मिळणार आहेत. ग्रामीण पोलिसांनी आता कॅशलेसकडे पाऊले टाकली आहेत. ई-चालान डिव्हाईसचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात येणार असून लवकरच कॅशलेस दंड भरण्याची सोय केली जाणार आहे. 

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी माहिती दिली, की स्पार्कन आयटी सोल्यूशन कंपनीशी करार करून ग्रामीण पोलिसांनी ई-चालान डिव्हाईस कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देऊन लगेचच जिल्ह्यात ५० मशीन सुरू करण्यात येणार आहेत. कंपनीचे प्रकल्प सहसंचालक गौरव राजपूत वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देत आहेत. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वाहतूक पोलिस या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. या कंपनीने आतापर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, अलिबाग आदी ठिकाणी असे डिव्हाईस कार्यान्वित केले आहेत. पुण्यात ५५० पोलिस असे डिव्हाईस वापरत आहेत.

असे करते कार्य
मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची सर्व रक्कम या डिव्हाईमध्ये फिड आहे. कलम टाकताच दंडाची रक्कम मशीन दाखवते. यात पोलिस वाहनचालकाचा मोबाईल क्रमांक, वाहनक्रमांक, परवाना क्रमांक फिड करू शकतात. ही माहिती सेव्ह राहून वाहनावर यापूर्वी कितीदा व काय कारवाई झाली याची माहिती मिळणार आहे. चोरीचे वाहन व वाहनाची खरी -खोटी माहितीही उकल होणार आहे.

पारदर्शकतेची चिन्हे
कॅशलेस व्यवहारांसाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे. विशेषत: दंड कमी आकारण्यात, परस्पर हडपण्यात गफला होण्याचे प्रकार घडत होते. तर कधी चांगल्या कर्मचाऱ्यांवरही चुकीचे आरोप होतात; परंतु आता ई-चालान डिव्हाईसद्वारे दंड भरण्याची सोय झाली आहे. यातच सर्व प्रक्रिया व व्यवहारही दिसणार आहेत.