टोळीकडून आणखी एक ट्रक जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - धुळे येथील संशयित जावेद मणियार व औरंगाबादेतील शेख बाबर यांनी हेराफेरी करून विकलेल्या आणखी एका ट्रकचा थांगपत्ता लागला. हा ट्रक त्यांनी परस्पर विक्री केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा ट्रक जालना येथून जप्त केला. यातील मुख्य सूत्रधार जावेद मणियार अद्याप पसार आहे. 

ट्रक चोरी, फसवणूक प्रकरणी शेख बाबरसह अन्य दोघांना औरंगाबादेतील गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. कर्जात दबलेल्या मालकाचा ट्रक भाड्याने चालविण्यासाठी घेतला जात होता. या ट्रकचे स्पेअर पार्ट, चेसिस; तसेच वाहन क्रमांक बदलला जात होता. त्यानंतर या ट्रकची परस्पर विक्री केली जात होती. ट्रक चोरी गेल्याचे मूळ मालकाला सांगून संशयितांची टोळी हात वर करीत होते. संशयित जावेद मणियार व शेख बाबर यांनी टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एम. एच. 18, ए. ए. 9937) चे चेसिस इंजिन क्रमांकात फेरबदल करून तो ट्रक सरदारखान (रा. आझाद चौक) यांना विकला. अशी माहिती गुन्हेशाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना समजली. त्यांनी व पथकाने या प्रकरणात सखोल तपास केला. त्यावेळी सरदारखान याने हाच ट्रक जालना येथे विक्री केल्याचे समोर आले. यानंतर पथकाने ट्रकचा शोध घेतला, असता जालना येथील शेख शोएब पाशा याच्याकडे ट्रक सापडला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. ट्रकच्या चेसिस क्रमांकात खाडाखोड, ओव्हर रायटिंग केल्याचे व इंजिन क्रमांकच नसल्याचे आढळले. या ट्रकची चेसिस इंजिनच्या तपासणीसाठी ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान संशयित शेख बाबर याला भिवंडी येथील गुन्ह्यात स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशी माहिती सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली.

Web Title: aurangabad news truck seized